ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

एकनाथ खडसे,www.pudhari.news

धुळे; पुढारी वृत्तसेवा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मार्ग मोकळा झाल्याचे श्रेय घेत असताना भारतीय जनता पार्टीने ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. पण आता राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याने हे आरक्षण घालवण्याचे अपयश देखील त्यांनी ढोल वाजवून करावे , असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केले . धुळ्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीकेची झोड उटविली.

राज्यात ओबीसी आरक्षणा संदर्भातला निर्णय झाला. मात्र, निर्णयानंतर प्रत्यक्षात ओबीसींना आरक्षण मिळाले नाही. आता राज्यातील ९२ नगरपालिकांची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. याची जबाबदारी कुणाची आहे? असा सवाल  खडसे यांनी केले.

डोंबिवलीत शिवसेना शहर प्रमुखाला अटक; परस्परविरोधी गुन्हे दाखल

ओबीसी आरक्षण मिळवल्याचे श्रेय घेत असताना भारतीय जनता पार्टीने ढोल वाजविले. आता या ९२ नगरपालिकांचे आरक्षण घालवल्याबद्दल त्यांनी ढोल वाजवून अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे ही कल्पना सहन होत नाही. याला आताचे सरकार जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रकार घडला. ओबीसींवरचा हा अन्याय आपण सहन करणार नाही. आरक्षणाशिवाय या निवडणुका होऊ देणार नाही, हा विषय घेऊन आता पुढे चालावे लागेल, असे आव्हान खडसे यांनी केले आहे. राज्यात घटनाबाह्य काम सुरू असल्याचे मत अनेक घटना तज्ञांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाल्यास राजकारण वेगळ्या मार्गाने जाईल. आता जनतेला भांडणात रस नसून जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही पोकळी भरून काढू शकेल. लोक मोठ्या आशेने त्यांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या पक्षाकडे पाहत आहे, असे देखील त्यांनी सांगितले. राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. गाव पातळीपर्यंत बूथ रचना आणि कार्यकारणी सक्षम झाली, तरच या मोठ्या निवडणूका जिंकणे शक्य होणार आहे, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचलंत का? 

The post ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा appeared first on पुढारी.