कन्हय्यालाल महाराजांचा 23 पासून यात्रोत्सव

कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सव,www.pudhari.news

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला होणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी येथील पहिल्या श्री कन्हय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवास (Kanhayalal Maharaj Yatrotsav) गुरुवार (दि.23) पासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून सर्व मंदिरांची रंगरंगोटी व सजावटीची कामे सुरू होती. ती पूर्ण झाली असून, मंदिर ट्रस्टतर्फे विविध सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे.

दीपोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते येथील श्री कन्हय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवाचे, त्यामुळे राज्यासह परराज्यांतील व्यापारी व भाविक आमळीत दाखल होत असल्याने यात्रोत्सवादरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात्रोत्सवात मनोरंजनपर विविध साधने, हॉटेल, संसारोपयोगी साहित्य, उंच पाळणे, तमाशा, मसाले, कपडे, सौंदर्यप्रसाधने, धार्मिक साहित्य आदी दुकानांची रेलचेल असते. यात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने दर्शन व नवसपूर्तीसाठी भाविकांसह व्यावसायिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

यात्रोत्सव काळात मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार आहे. सुरक्षेसाठी मंदिर समितीतर्फेही सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच चोवीस तास पोलिस बंदोबस्त मंदिर व यात्रोत्सव परिसरात राहणार आहे.

हेही वाचा :

The post कन्हय्यालाल महाराजांचा 23 पासून यात्रोत्सव appeared first on पुढारी.