कळवण शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ : माजी आमदार जे. पी. गावित

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण शहराचे गतवैभव परत प्राप्त करण्यासाठी व तालुक्यातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी शहरातील व्यापारी बांधवांसह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, वनजमीन धारक, नोकरदार यांनी माकपा पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभे राहावे, असे आवाहन माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले.

नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार यांचे प्रश्न सोडविल्याबद्दल आज (दि. १८) दुपारी मानूर ते कळवण विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर कळवण बसस्थानक परिसरात घेतलेल्या या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाकोडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष गांगुर्डे होते.

या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पदाधिकारी डॉ. डी. एल कराड, किसनसभा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, सुरगाणा पंचायत समिती सभापती इंद्रजित गावित, सावळीराम पवार, अॅड. भाऊसाहेब पवार, पोपटराव पवार, भरत शिंदे, टिनू पगार, जयवंत पवार, सुभाष चौधरी, उत्तम कडू, जनार्दन भोये, दिंडोरी तालुका सचिव हनुमान गुजाळ, धमराज शिंदे आदी होते.

गावित म्हणाले की, कळवण तालुक्यातील ओतूर, जामशेत धरणासह कनाशी येथील 132 केव्ही उपकेंद्र आदी विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. लवकरात लवकर ही कामे मार्गी लागली नाही, तर पुन्हा सरकारला मुंबईत जाऊन घेरू, असा इशाराही यावेळी गावित यांनी दिला.

तसेच चणकापूर धरणाचे पाणी कळवण शहराला देण्यास आमचा विरोध नाही. परंतु ते पाणी पाईपलाईन ऐवजी नदी प्रवाहाने द्यावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांना त्यांचे हक्काचे पाणी नदीप्रवाहाने मिळवून देण्यासाठी शासनास भाग पाडू, असेही गावित यांनी सांगितले.

या विजयी मेळाव्यासाठी कळवण तालुक्यातील हजारो शेतकरी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन, सदस्य, नोकरदार, व्यापारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माकपाच्या विजयी सभेच्या व्यासपीठावर शिवसेना, शिंदे गटाचे उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र पगार, तालुकाध्यक्ष शरद पगार, संदीप वाघ, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केदा सोनवणे, भाजपाचे शेतकरी आघाडीचे जिल्हापाध्यक्ष राजेंद्र पवार, मोहनदरीचे ग्रामपंचायत सदस्य विलास चव्हाण आदी उपस्थित होते. त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा 

The post कळवण शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ : माजी आमदार जे. पी. गावित appeared first on पुढारी.