कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल तर …

राहुल गांधी

चांदवड : सुनील थोरे-तालुक्यात सर्वाधिक कांदा पिकला जातो. हा कांदा विक्रीला आल्यानंतर केंद्र सरकारने निर्यातबंदी केली. त्यामुळे बाजारभाव पडून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसेही गेले. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. जर तुमच्या कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल, तर दिल्लीत तुमच्या विचारांचे, तुमचे ऐकणारे, हक्काचे सरकार हवे. तुमच्या हक्काचे सरकार पुन्हा एकदा दिल्लीत बसवा अशी साद राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना घातली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. १४) खा. गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार शरदचंद्र पवार, खा. संजय राऊत, जयराम रमेश, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, श्रीराम शेटे, योगेंद्र यादव, जे. पी. गावित, तुषार शेवाळे, जयंत दिंडे, हेमलता पाटील, शिरीषकुमार कोतवाल, संजय जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर आदी उपस्थित होते.

खा. गांधी म्हणाले, दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशातील शेतकरी न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र, निर्दयी केंद्र सरकार त्यांच्यावर हल्ले करून त्रास देत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे करत, दडपशाही करीत आहे. गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने शेतकऱ्यांचा एक रुपयांचीदेखील कर्जमाफी केली नाही. उलट देशातील अरबपती असलेल्या उद्योगपतींचे जवळपास १६ लाख करोड रुपयांचे कर्ज माफ केले. देशात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० लाख करोड रुपयांची कर्जमाफी केली होती. जर अरबपती यांचे कर्जमाफ होत असेल, तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे अशी मागणी गांधी यांनी केले.

यावेळी खा. संजय राऊत यांनी, मोदी सरकारवर कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे बाजारभाव पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणारे दोन रुपये गुजरातमधील व्यापाऱ्यांच्या खिशात घातल्याचा आरोप केला. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारी, ट्रान्सपोर्ट यांनादेखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. केंद्र सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिरीषकुमार कोतवाल यांची भाषणे झाली.

शेतकरी सरकारला धडा शकवतील

खा. पवार यांनी, केंद्र सरकारमधील एकालाही शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा समजत नाहीत. केंद्र सरकार पूर्णपणे व्यापारीधार्जिणे आहे. यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी जर आंदोलने, रास्ता रोको केला, तर ताबडतोब त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात होते. मात्र, सध्याचे सरकार जुलमी, हुकूमशाही व दडपशाही करून शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. आता योग्य वेळ आली असून, मोदी सरकारला धडा शिकविल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही अशी असा विश्वास खा. पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

The post कांदा, द्राक्षाला चांगला भाव हवा असेल तर ... appeared first on पुढारी.