काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे

अजित पवार, दादा भुसे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही वर्षांपासून अस्वस्थ आहेत. ते काही घटनांमुळे जाणवत असून सध्याची राजकीय परिस्थिती काहीही होऊ शकते, असे वक्तव्य राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या ना. भुसे यांनी शुक्रवारी (दि. १४) विश्रामगृह येथे संवाद साधताना हे विधान केले. आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागताना, त्यांचे विधान बालिश असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू स्मारकातील कामे वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे लवकरच पाचोरा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा काही परिणाम राज्य सरकारच्या भूमिकेवर होईल का, याबाबत ना. भुसे यांना विचारले असता, ठाकरे यांनी यापूर्वी मालेगावचाही दौरा केला आहे, असे सूचक विधान ना. भुसे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आहे. कुणाच्या कानात कुजबुज करून नव्हे, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हा पक्ष उभा केल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 43 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे वक्तव्य करणाऱ्या खा. संजय राऊत यांची खिल्ली उडवताना, देशात स्वप्न पाहण्यास मनाई नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी

जिल्ह्यात १५ ते २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित सर्वांना नुकसानभरपाई मिळेल, अशी ग्वाही ना. दादा भुसे यांनी दिली. अयोध्या दौरा 15 दिवस आधीच ठरला होता. अयोध्येला गेलो त्या दिवशी गारपीट झाली. नुकसान झाल्याचे दु:ख असून अयोध्या दौऱ्यावरून काहूर माजवले गेले. अयोध्येहून परतल्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसान पाहणी दौरा केल्याचे सांगत ना. भुसे यांनी ‘गेलाे तरी टीका; नाही गेलो तरी टीका’, अशी खंत व्यक्त केली. आम्ही कुठेही गेलो, तरी शेतकऱ्यांच्या पाळीशी आहोत, असेही ना. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post काही वर्षांपासून अजित पवार अस्वस्थ : दादा भुसे appeared first on पुढारी.