कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत ‘ट्रॅफिक सेल’, आठ पदांना स्थायीची मंजुरी

कुंभमेळा नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन तसेच पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वंकक्ष वाहतूक नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीकरिता ‘ट्रॅफिक सेल’ अर्थात वाहतूक कक्ष स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. या ट्रॅफिक सेलकरिता कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यासह सहायक अभियंता दोन तसेच कनिष्ठ अभियंता चार अशा एकूण आठ पदांच्या निर्मितीला तसेच त्यावर नियुक्तीकरीता आवश्यक अर्हता निर्धारीत करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळखल्या जाणाऱ्या नाशिक महानगराची लोकसंख्या सुमारे २५ लाख असून, २०५० पर्यंत ती ६० लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शहरात खासगी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पर्यायाने अपघात व वायू-ध्वनिप्रदूषण वाढीची चिंताजनक आहे. शहराच्या आरोग्य व विकासाचे मोजमाप हे शहराच्या सुदृढ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरून केले जाते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विस्तारीकरण हे अभ्यासपूर्वक व नियोजनपूर्वक केल्यास प्रदूषण व वाहतूक समस्येत घट होते. तसेच नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थेमुळे शहराच्या सकारात्मक प्रगतीमध्ये मोठी मदत होत असते. शहरातील वाहतूकविषयक समस्यांच्या निराकरणासाठी तत्कालिन पोलिस आयुक्तांनी वाहतूक समन्वय समिती गठीत केली होती.

दरम्यान, राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी महापालिकेला पत्र पाठवत वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी सर्वंकष आराखडा तयार करून ट्रॅफिक सेलची निर्मिती करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने त्यानुसार आराखडा तयार केला परंतु पद मंजुरी नसल्यामुळे या सेलची निर्मिती होऊ शकली नव्हती. महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीला शासनाने नुकतीच मंजुरी दिली. त्यातही ट्रॅफिक सेलकरिता कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने महासभेत ठराव संमत करत शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने २७ फेब्रुवारीला मंजुरी दिली. त्यानंतर तातडीने पदनिर्मिती आणि त्यावर नियुक्तीकरिता आवश्यक अर्हता निर्धारित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता.

ट्रॅफिक सेलची जबाबदारी

* सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करणे.

* वाहनतळ निर्मिती, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण.

* रस्त्यांवर सायकल ट्रॅक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती.

* सार्वजनिक वाहतुकीसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टरची उभारणी.

* पूल, बांधकामांची उभारणी ब्लॅकस्पॉट निर्मूलन.

* गर्दीच्या वेळी मार्गक्रमणांमध्ये बदल करणे.

* सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.

—-

अशी झाली पदनिर्मिती

कार्यकारी अभियंता (वाहतूक नियोजन) – १

उपअभियंता (वाहतूक) – १

सहायक अभियंता (वाहतूक) – २

कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) – ४

हेही वाचा :

The post कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत 'ट्रॅफिक सेल', आठ पदांना स्थायीची मंजुरी appeared first on पुढारी.