गुढीपाडव्यासाठी पालिकेचे खास नियोजन, गोदाघाटावर होणार ‘हे’ कार्यक्रम

गुढीपाडवा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रशासकीय राजवटीत का होईना, नाशिक महापालिकेची मराठी अस्मिता जागी झाली असून, महापालिका आणि राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त दि. ५ ते ९ एप्रिल या दरम्यान गोदाघाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी १५ लाख रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकतर्फे दरवर्षी गोदाघाटावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले जाते. यावर्षी ‘स्वदेशी’ या थीमवर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महापालिकेने हाती घेतलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे औचित्य साधून गोदावरीचे पावित्र्य कशा प्रकारे राखावे व ते जपण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण २०२४मध्ये नागरी सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या १२ व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या निर्दिष्ट करणाऱ्या तरतुदीशी संबंधित आहे. या अनुसूचीमध्ये एकूण १८ बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यापैकी बाब क्र. १३ मध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सौंदर्यात्मक पैलूंना प्रोत्साहन देणे याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

या तरतुदीचा आधार घेत येत्या ९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षानिमित्त गोदाघाटावर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १५ लाख रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे.

हे कार्यक्रम घेणार

गुढीपाडव्यानिमित्त गोदाघाटावर दि. ५ ते ९ एप्रिल या दरम्यान पर्यावरण रक्षण, स्वच्छ सर्वेक्षण या विषयांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यात रांगोळी, महावादन, अंतर्नाद, मर्दानी खेळ स्पर्धा आदींचा समावेश असणार आहे. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत.

हेही वाचा

 

The post गुढीपाडव्यासाठी पालिकेचे खास नियोजन, गोदाघाटावर होणार 'हे' कार्यक्रम appeared first on पुढारी.