गृहनिर्माण परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही

प्रवीण दरेकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील स्वयंपुनर्विकासासाठी महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशन, राज्य सहकारी बँक आणि सरकार असे सर्व मिळून निधी उपलब्ध देऊ, अशी ग्वाही भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी दिली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व नाशिक जिल्हा को-ऑप. फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित गृहनिर्माण परिषद व कार्यशाळेत ते बोलत होते.

व्यासपीठावर आ. राहुल आहेर, आ. सीमा हिरे, महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, महाराष्ट्र हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजप जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा को-ऑप. फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. वसंतराव तोरवणे, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, प्रकाश दरेकर, तालुका उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, ॲड. श्रीपाद परब आदी उपस्थित होते.

आ. दरेकर म्हणाले, गृहनिर्माण सहकारामध्ये स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून विकासकाशिवाय इमारती उभ्या राहू शकतात अशा प्रकारची भूमिका घेऊन जेव्हा मुंबईत काम सुरू केले, परंतु मी त्यावेळी ठाम होतो. यासाठी मुंबई जिल्हा सहकारी बँकेने स्वयंपुनर्विकासाचे धोरण केले. आता गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासाठी सोळाशे प्रस्ताव बँकेकडे आहेत. १२ इमारती मुंबईत स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत. हे सर्व यशस्वी होण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. विरोधी पक्षनेते असताना आरबीआयकडे जाण्याचे काम त्यांनी केले आणि आज हे धोरण कार्यान्वित झाल्याचे ते म्हणाले. तसेच स्वयंपुनर्विकासासंदर्भात जेवढ्या सवलती देता येतील तेवढ्या शासनाने दिलेल्या आहेत. आपण शेतकरी, कामगारांना सवलत देतो. परंतु गृहनिर्माण संस्थेत राहणारा सभासद आहे तोही नागरिक, मतदार आहे. जर त्यांच्या व्याजदरातील काही भाग सरकारने उचलला तर त्यांना मदत होईल. चार टक्के व्याजदर शासनाने घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. नाशिकला स्वयंपुनर्विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियोजन आणि अॅक्शन प्लॅन करण्याची गरज आहे. हौसिंग फेडरेशनच्या कार्यालयात याबाबत मार्गदर्शन ठेवा, असे आवाहनही दरेकरांनी केले. दरम्यान, यावेळी कै. बिरजीचंदजी रामचंद्र नहार, माजी आरोग्यमंत्री कै. डॉ. दौलतराव सोनूजी आहेर, कै. अर्जुन मुलचंद कठपाल यांच्या नावे आमदार दरेकरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

मुंबईत ‘धन्यवाद देवेंद्रजी’ कार्यक्रम
२० फेब्रुवारीला मुंबईत अभ्युदयनगर येथील शहीद भगतसिंग मैदानात मोठा कार्यक्रम घेतला आहे. तेथेही १५-२० हजार वेगवेगळ्या हौसिंग सेक्टरमधील लोक येणार आहेत. या सर्व लोकांचा त्या ठिकाणी मेळावा आहे. त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस येणार आहेत असल्याचे यावेळी आ. दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post गृहनिर्माण परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही appeared first on पुढारी.