Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार

जलरथ pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे अतिशय योग्य पद्धतीने सुरु आहेत. जलयुक्तशिवार आणि जल जीवन मिशनमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होईल. राज्यात जलसाक्षरता करण्यासाठी जलरथाची मोहीम आखण्यात आलेली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात या जलरथांद्वारे जलसाक्षरता होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार योजनांतर्गत ग्रामीण पातळीवर प्रचार व प्रसिध्दीसाठी तयार करण्यात आलेल्या जलरथांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरु दक्षिणा हॉलमध्ये पार पडला. यावेळी पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, जलजीवन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहूल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दिपक पाटील हे उपस्थित होते.

राज्याच्या पाणी व स्वच्छता विभाग व भारतीय जैन संघटना यांच्या समन्वयाने २०० पेक्षा जास्त चित्ररथांच्या (जलरथ) माध्यमातून जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार योजनेचा प्रचार करण्यात येणार आहे. जलरथांचा शुभारंभ नाशिकला करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जल हे निसर्गाने मोफत दिलेले संसाधन आहे. पण त्याचा कसाही वापर केला जात असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. संपुर्ण देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत. पण पाणी प्रणाली बघता अर्ध्या महाराष्ट्राला जलसंधारणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती. यामधून पहिल्या टप्प्यात २२ हजार गावांपर्यंत पोहचता आले. त्यासोबतच गाळमुक्त धरण योजना राबविली होती, असे त्यांनी सांगितले.

मागील सरकारने जलयुक्त शिवारच्या कामांवर आक्षेप घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात अनेक आरोप करण्यात आले. न्यायालयाने समिती नेमून जलयुक्त शिवारची चौकशी केली. चौकशीअंती दिसून आले की मराठवाड्यात पाणी पातळीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. त्यामुळेच ही योजना उत्तम असल्याचे सांगितले. त्यामुळे आपलेे सरकार येताच पुन्हा जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जलयुक्त शिवार, जलजीवन मिशन आणि जलसंधारण या योजना म्हणजे मावसभाऊ असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, राज्यात यापुर्वी ३३ टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळत होते आता ही संख्या ८० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ लाख कोटी रुपये फक्त पाणी या घटकासाठी दिले आहे.
पालकमंत्री भुसे यांनी यावेळी बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले तर गोरगरीब लोकांना रोजगार उपलब्ध होतो. जलयुक्त शिवारमुळे राज्यातील पाण्याची भुजल पातळी 2 ते 3 मीटरपर्यंत वाढली होती. पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घेऊ.

रथाला देवांचे आशिर्वाद
जलरथाचा शुभारंभ नाशिकमधून करण्यामागे प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नक्कीच या रथाला देवांचे आशिर्वाद मिळतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गाळ काढण्यासाठी निधी
पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सर्व आमदारांच्या निधीतील २० टक्के निधी हा गाळ काढण्यासाठी राखीव ठेवल्यास प्रत्येक मतदारसंघात गाळ काढण्याचे काम सोपे होईल. याबाबत शासन निर्णय काढण्याची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केली.

डिझेलसाठी राखीव निधी
पालकमंत्री भुसे यांनी यावेळी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या विनंतीची री पुढे ओढत जिल्हा नियोजन समितीला डिझेलसाठी राखीव निधी ठेवण्याच्या सूचना देण्याची विनंती केली. जेणेकरुन मतदारसंघांमध्ये जलयुक्त शिवार, गाळमुक्त गाव ही कामे लवकर होतील, अशी विनंती केली.

The post Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार appeared first on पुढारी.