ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची

निवडणूक स्पर्धा www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
माघारीची प्रक्रिया झाल्यानंतर तालुक्यातील 13 पैकी 12 ग्रामपंचायतींत थेट सरपंचपदाची निवडणूक लागली आहे. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेली लढत दाभाडीत होत आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्या अनुषंगाने याठिकाणी पारंपरिक विरोधकांत एकाची भर पडून तिरंगी लढत मानली जात होती. परंतु, प्रत्यक्षात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मंत्री दादा भुसे समर्थकांनीच परस्परांविरोधात दंड थोपटल्याने साहेबांची रसद कुणाला मिळणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचपदासाठी पाच उमदेवार रिंगणात आहेत. ना. भुसे समर्थक तीन आणि एक कट्टर शिवसैनिक यांच्या स्पर्धेत पारंपरिक कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल गेलेली सत्ता खेचून आणण्यात यशस्वी होणार का, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

तालुक्याच्या राजकारणात दाभाडीचे नेहमीच वेगळे महत्त्व राहिले आहे. ना. भुसे लाटेत हा हिरेंचा गड खालसा होऊन शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दाभाडी नावारूपाला आला. परंतु, गत पंचवार्षिक निवडणुकीत हिरे गटाने सत्तांतर घडवत शिवसेनेला जोरदार धक्का दिला होता. थेट सरपंचपदाच्या उमेदवार चारुशीला अमोल निकम यांच्यासह 10 सदस्य निवडून येत एकहाती भाजपची सत्ता आली होती. दरम्यान, एककल्ली कारभाराने या गटात धुसफूस निर्माण होऊन निकम यांच्यावर अविश्वास ठराव येऊन तो ना. भुसे गटाच्या सात सदस्यांच्या पाठबळाने मंजूरही झाला होता. निकम पायउतार होऊन शिवसेनेने अडीच वर्षांतच पुन्हा सत्ता हस्तगत केली. आता दुसर्‍यांदा थेट जनतेतून सरपंच निवड होत असताना हे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) निघाल्याने आपसूकच मातब्बरांच्या महत्त्वाकांक्षांना घुमारे फुटले आहेत. त्यातूनच ना. दादा भुसे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना गट आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल अशी सरळ लढत अपेक्षित असताना शिवसेनेचेच चार उमेदवार सरपंचपदाच्या आखाड्यात उतरले आहेत. गत पंचवार्षिकमधील शिवसेनेची गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्यात मोठी भूमिका निभावणारे गिरणाकाठ प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निकम यांनी सरपंचपदावर दावा ठोकला आहे. ना. भुसेंचे दुसरे समर्थक माणुसकी फाउंडेशनचे नाना निकम यांनीही सरपंचपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात ना. भुसे यांचे अत्यंत निकटवर्तीय, पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम हेदेखील रिंगणात उतरल्याने नेतृत्वाची कोंडी झाली अहो. ती फोडण्यात यश न आल्याने ‘साहेबां’नी तटस्थ भूमिका घेतल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. भाजप नेते डॉ. अद्वय हिरे व काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने सरपंचपदासाठी कृउबाचे माजी संचालक संजय निकम यांना उमेदवारी दिली आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहिलेले पंचायत समितीचे माजी सदस्य संयोग निकम हेदेखील सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत. या भाऊगर्दीचा हिरे गटाला फायदा होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ऐन थंडीत निवडणूक प्रचाराचा ज्वर चढत असून, जनमताचा कानोसा घेतल्यानंतर नेतृत्वाने सावध पवित्रा घेतल्यास सध्याची पंचरंगी निवडणूक अखेरच्या टप्प्यात तिरंगी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

चौघांचा अपवाद वगळता सर्व नवखे
सरपंचपदासाठी पाच, तर 17 जागांसाठी 49 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण सहा वॉर्ड आहेत. प्रमोद निकम यांचे दाभाडी ग्रामविकास पॅनल, तर शशिकांत निकम यांनी जनसेवा पॅनल दिले आहे. नाना निकम यांनी पॅनलनिर्मिती टाळून ते केवळ सरपंचपदासाठी लढत देतील. याव्यतिरिक्त हिरे पॅनल पारंपरिक लढतीसाठी सज्ज आहे. गतवेळीचे केवळ दोन सदस्य यावेळीही रिंगणात असून, उर्वरित दोघांचा अपवाद वगळता सर्व उमेदवार नवखे आहेत.

वॉर्डनिहाय स्थिती अशी…
क्रमांक                    जागा                      उमदेवार                    मतदारसंख्या
1                           3                            8                             2,274
2                           3                            9                             3,290
3                           2                            6                             3,044
4                           3                            8                             2,670
5                           3                            9                             2,360
6                           3                            9                             1,965
एकूण                        17                          49                           15,603

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूक : भुसे समर्थकच भिडल्याने दाभाडी सरपंचपदाची लढत चुरशीची appeared first on पुढारी.