जळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा; काश्मीरमध्ये मागणी वाढल्याने दरवाढ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही महिन्यांपासून केळीला भावच मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. जागतिक पातळीवर केळीचा तुटवडा असला तरी निर्यात बंद असल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या हाती काहीच येत नव्हते. मात्र आता केळी उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काश्मीरमधील बर्फामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या निर्यातक्षम केळी मालाला ३२०० ते ३३५० रुपये, तर साधारण केळीलाही किमान २७०० ते ३००० रु. प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इथल्या केळीला जीआय मानांकन देखील मिळाले आहे. जळगावच्या केळीला उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीरपर्यंत मागणी असते. जळगाव जिल्ह्यातून केळी सौदी अरब, इराण, कुवैत, दुबई, जपान, आणि युरोपिय देशात निर्यात होते. जळगाव जिल्हाच्या अर्थव्यवस्थेला केळीचा मोठा हातभार लागलो. मात्र दर वर्षी केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत असते. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी निर्यात बंदीचा फटका केळी उत्पादक शेतकर्‍यांना बसतो. सध्याची परिस्थिती अशीच आहे. मात्र त्यात दिलासा म्हणजे, जम्मू-काश्मीरसह लद्दाखमधील बर्फाच्छादित मार्ग आता खुला झाला आहे. यामुळे केळीची मागणी वाढली आहे.

दीड-दोन महिने भाव स्थिर राहणार…

जागतिक बाजारपेठेत केळीला प्रचंड मागणी आहे. मात्र निर्यात बंदीमुळे त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत नाही. सध्या मध्यप्रदेश व आंध्र प्रदेशातील केळी उत्पादनात घट झाली आहे. यामुळे उत्तर भारतातील व्यापारी जळगावकडे वळले आहेत. या परिस्थितीमुळे केळी आगारातील रावेर, मुक्ताईनगर, बर्‍हाणपूर, यावल व चोपडा या तालुक्यांतील केळीला मागणी वाढली आहे. जम्मू-काश्मीर तथा लद्दाखपर्यंतचे बर्फाच्छादित मार्ग आता वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे तिथे केळी मालाच्या मागणीतही वाढ झाली आहे. तेजीत असलेली केळीची बाजारपेठ किमान दीड-दोन महिने अशीच स्थिर राहील, असे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा:

The post जळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा; काश्मीरमध्ये मागणी वाढल्याने दरवाढ appeared first on पुढारी.