जळगाव : आता तरी आम्हाला विसरा, किती दिवस असे छळणार? गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल

गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

‘किती दिवस बंड झाले, बंड झाले यावर बोलणार. आता तरी आम्हाला विसरा. किती दिवस आम्हाला असे छळणार’ ? असा सवाल करत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, गेल्या नऊ महिन्यापासून तु्म्ही तेच तेच सांगत आहात. किती दिवस बंड झाले बंड झाले यावर बोलणार. नऊ महिन्यात लग्न झाल्यावर अपत्यही होते. एखाद्या घरात तरुणाचा मृत्यू झाला तर 10 दिवसात विसरतात. आता तरी आम्हाला विसरा. किती दिवस लोकांना असे छळणार. बंद करा आता हे. बंड झाले, उठाव झाला 9 महिने होऊन गेले. आता पक्षबांधणीकडे लक्ष द्या. पुन्हा तुमचे सरकार कसे येईल याकडे जोमाने लक्ष द्या. तेच तेच बोलणे ऐकून आता लोक टीव्ही पाहायलाही कंटाळले आहेत.

विकासाबाबत का बोलत नाहीत…
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून नऊ महिने झाले तरी तुम्ही अजूनही तेच सांगत आहात. मात्र राज्याच्या विकासाबाबत तुम्ही काहीच का बोलत नाहीत. तुमच्या या टीकेमुळे आता राज्यातील जनताही कंटाळली आहे. त्यामुळे आता पक्ष वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले आहे. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन म्हणाले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : आता तरी आम्हाला विसरा, किती दिवस असे छळणार? गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल appeared first on पुढारी.