जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच

जळगाव केळी,www.pudhari.news

जळगाव : चेतन चौधरी

हवामानावर आधारित फळपीक विम्याची रक्कम भरण्याची मुदत संपली असून, जिल्ह्यात ७० हजारांहून अधिक केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरल्याची माहिती पीकविमा कंपनीकडून देण्यात आली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, यामुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ हजार हेक्टर केळीच्या क्षेत्राला विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ, तर कधी हिवाळ्यातदेखील पाऊस होऊन थंडीच्या लाटा येत आहेत. यासह अनेक वेळा अवकाळी व वादळी पावसामुळे केळीचे नुकसान होत असते. मात्र, शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घेतला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना केवळ शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आता हवामानात होणाऱ्या बदलांमुळे पिकांचे नुकसान होऊन बसणारा आर्थिक फटका टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीकविमा काढला जात आहे.

७० हजार शेतकऱ्यांनी काढला विमा

यंदा जिल्ह्यात ७० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली आहे. त्यामुळे पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. केळी पीकविम्याचे २०२० मध्ये निकष बदलण्यात आले होते. त्या जाचक नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनदेखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नव्हती. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर २०२१ मध्ये पुन्हा निकष बदलण्यात आले. त्यामुळे तापमानात वाढ व घट अशा दोन्ही बाबींमध्ये शेतकरी पात्र ठरत असल्याने शेतकऱ्यांनी विमा काढण्यावर भर दिला आहे.
पीकविमा ठरतोय फायदेशीर

पीकविमा काढल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त होते. नुकसानीची रक्कमदेखील विमा हप्त्याच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे विमा भरूनही नुकसान झाले नाही तरी शेतकऱ्यांना फार काही आर्थिक फटका बसत नाही.

पाच वर्षांतील आकडेवारी अशी

जिल्ह्यात २०१८ मध्ये ४१ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेतला होता. २०१९ मध्ये ४७ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. २०२० मध्ये ४४ हजार, २०२१ मध्ये ५१ हजार, तर २०२२ मध्ये यात वाढ होऊन ७० हजारांच्या वर शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेतला आहे.

हेही वाचा :

The post जळगाव जिल्ह्यात केळीला विम्याचे कवच appeared first on पुढारी.