जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

सुनिल खंडू धनगर www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शेतात विहिरीवरील पाण्याची मोटर सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील धानोरा गावात घडली असून, याप्रकरणी बुधवारी (दि.२८) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (३०) हा तरूण शेतीचे कामे करून  परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे धानोरा शिवारात शेत असून, सुनिल हा शेतात पाणी देण्यासाठी गेला असता त्याने विहीरीतील विद्युत पंप सुरु करण्यासाठी जवळच असलेला स्विच सुरु केला. यावेळी विजेचा जोरदार धक्का बसून तो जागीच ठार झाला. त्यास तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती सुनिल यास मयत घोषीत केले. याबाबत बुधवारी (दि.२८) सकाळी १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, पत्नी सोनूबाई, भाऊ कैलास, दोन विवाहित बहिणी आणि तीन मुली असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : पाण्याची मोटर सुरु करताना विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार appeared first on पुढारी.