जळगाव : बनावट सोन्याची नाणी देऊन साडेनऊ लाखांची फसवणूक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: स्वस्तात सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून नागपुरातील एकाची साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार दिनेश दत्तुजी भोंगडे (वय ३४, नागपूर) यांना संशयित कृणाल किशोर मुलमुल (नागपूर) व त्याच्या तीन साथीदारांनी सोन्याचे एक खरे नाणे दाखवून अन्य नाणी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर भोंगडे हे मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील डोलारखेडा रस्त्यावर आले. याठिकाणी संशयितांनी साडेनऊ लाखांची रक्कम स्वीकारून भोंगडे यांना ४०० नाणी दिली.

या नाण्यांची तपासणी केल्यानंतर ते पिवळ्या धातूची नकली नाणी निघाली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर भोंगडे यांच्या तक्रारीनंतर कृणाल किशोर मुलमुल व तीन अन्य साथीदारांविरोधात मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

The post जळगाव : बनावट सोन्याची नाणी देऊन साडेनऊ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.