Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

बाजारपेठ शुकशुकाट www.pudhari.news

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा

जून महिना अर्ध्याच्या वर संपला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर शंभर टक्के पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येते. यंदा जूनचा पंधरवडा उलटला, तरी दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत. वेळेवर पाऊस झाल्यास 7 जूनच्या आसपास मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झाल्यास शेतमालाचा उतारा चांगला येतो, असा ज्येष्ठ शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षी 7 जूनच्या पेरणीची मुहूर्त हुकल्याने शेतकऱ्यांची चिता वाढली आहे. दररोज सकाळी सोसाट्याचा वारा, दुपारी ऊन, सायंकाळी पावसाचे दाटून आलेले काळे ढग आणि रात्री आकाशात चांदणे पडत आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या ऊन-सावलीच्या या खेळाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पाऊस पडताच पेरण्या करून खते घेण्यासाठी शेतकरी खतांची खरेदी करतो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल खतांच्या बाजारपेठेत होते. जून महिना सुरू होऊनही बाजारपेठेत शांतता आहे. बियाणे-खते विक्रेत्यांना पाऊस पडल्यानंतर बोलायला वेळ नसतो. एवढे ग्राहक त्यांच्याकडे असतात.

जून महिन्यातील 15 दिवस उलटूनही अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. वेळेवर पाऊस पडला नाही व पेरणी उशिरा झाली, तर याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो. -इंदर महाले, शेतकरी, कनाशी.

हेही वाचा:

The post Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट appeared first on पुढारी.