जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव www.pudhari.news

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा

गुजरात राज्यातील एका दुकानदाराची औषध देण्याचा बहाणा करून लुटमार झाल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याला घरी बोलावून चाकू, बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत १० ते १२ जणांनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दर्शन बिपीनभाई सौलंकी (३२,रा. जांगीपूरा डबोली सुरत (गुजरात) यांचे औषधाचे दुकान आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावातील सुरेश चव्हाण याने दर्शन सौलंकी यास औषध घेण्याचा बहाणा करून मधापुरी गावाला बोलावून घेतले. त्यानुसार दर्शन हा गुरुवारी, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मधापुरी गावात मित्र विशाल उगाभाई गलचर याच्यासोबत आला. दरम्यान, दर्शन व सुरेश यांची भेट झाल्यानंतर  सुरेशसह इतर १० ते १५ जणांनी तोंडावर रूमाला बांधून बंदूक, चाकू आणि काठ्यांनी हल्ला केला. त्यांनी सुरूवातीला दर्शनचा मित्र विशाल गलचर याला बेदम मारहाण केली व त्याच्या खिश्यातील दीड लाखांची रोकड काढून घेतली. त्यानंतर भारत प्रविण पवार यांच्या बँक खात्यात संलग्नित असलेल्या शुभम पाटील याच्या मोबाईलवर गुगल पे वरून ४९ हजार ९९९ रूपये पाठविले. तसेच दर्शनचा मित्र विशालच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किमतीचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेतला. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पाच दिवसानंतर दर्शन सौलंकी याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश चव्हाण याच्यासह इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राहूल बारेकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.