जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत

जळगाव केळी,www.pudhari.news

जळगाव : चेतन चौधरी
जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, जिल्ह्यात सर्वाधिक 52 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसत आहे. मे महिना उलटून जून सुरू झाला असला, तरी तापमानाचा पारा काही कमी होताना दिसत नाही. यावल, रावेर तालुक्यांतील सरासरी तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. या तापमानामुळे केळीबागांना फटका बसला असून, पाने, शेंडा करपण्यासह केळीचे घड सटकणे, उन्हाच्या चटक्यांमुळे घडांना काळे डाग पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. तर दुसरीकडे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने योग्य पद्धतीने पाणी देणेही शेतकर्‍यांना शक्य होत नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे.

केळीच्या वाढीसाठी साधारणपणे 38 अंशांचे तापमान आवश्यक असते. यापेक्षा अधिक तापमानाचा पारा वाढल्यास केळीबागांवर विपरीत परिणाम होतात. सध्या केळीपट्ट्यात सरासरी 40 अंशांवर तापमान आहे. या कारणांमुळे केळीचे घड सटकण्याची सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. झाडाची पाने उन्हामुळे फाटून करपत आहेत, तर कोवळा शेंडा काळा होऊन वाढ थांबली आहे. दररोज प्रतिझाड 30 लिटर पाणी देऊनही बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत असल्याने केळीबागेच्या दोन ओळींमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांवर आता अधिक पाणी देण्याची वेळ आली आहे. बहुतांश केळी उत्पादक शेतकर्‍यांनी तापमानाच्या वाढीचा फटका बसू नये, म्हणून ग्रीन शेडनेटचा कपडा बागांच्या चहूबाजूंनी लावून कुंपण तयार केले आहे. ग्रीननेटचा खर्चिक भार सहन करू न शकणारे शेतकरी तुरकाट्या आणि कापसाच्या काड्यांचे कुंपण किंवा घरातील जुन्या वापरात नसलेल्या साड्या लावत आहेत.

वीजपुरवठा वारंवार खंडित
एकीकडे नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने केळीबागांमध्ये तासन्तास पाणीपुरवठा करण्यासाठी वीजपंपही सुरू होत नाही. भारनियमनाविरोधात भुसावळ तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने केळीच्या झाडांना पाणी मिळत नाही, त्यामुळे अनेक झाडे सुकत आहेत. झीरो लोडशेडिंगच्या नावाखाली केवळ चार ते पाच तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

उन्हामुळे मजूर मिळेना
केळीच्या बागांमध्ये वेगळ्या पद्धतीने कामे करण्यासाठी वाढत्या उन्हात मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे केळीबागांमधील झाडांची वाढ थांबत असून, दुसरीकडे वाढत्या इंधन दर व रासायनिक खतांच्या किमतीमुळेही शेतकरी वैतागला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : वाढते तापमान अन् भारनियमनामुळे केळी उत्पादक अडचणीत appeared first on पुढारी.