जळगाव : सोने चाेरणाऱ्या ‘त्या’ मॅनेजरच्या शोधासाठी पथक रवाना

बँक www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

भुसावळ शहरातील मणप्पुरम गोल्ड बँकेतील सुमारे २ किलो वजनाचे १ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोने बँकेच्या मॅनेजरनेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे या मॅनेजरने वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडमध्ये १० लाखांचा अपहार केला होता. याची शिक्षा म्हणून दोन महिन्यांपूर्वी भुसावळला नियुक्तीवर पाठवले होते. मात्र, येथे आल्यावर त्याने बँकेतून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने लांबवले. संशयीत मॅनेजरच्या शोधासाठी पोलिसांनी पथक नियुक्त करण्यात आले असून ते गोरखपूरला रवाना झाले आहे.

भुसावळ शहरातील मणप्पूरम फायनान्स बँकेचे शहरात २१०० ग्राहक आहेत. तेथून एक कोटी रुपये किमतीचे २ किलो ६० ग्रॅम वजनाचे दागिने बँक व्यवस्थापक विशाल राय (३०, रा. उत्तर प्रदेश) याने लांबवल्याची तक्रार आहे. संशय राय याची दोन महिन्यांपूर्वी भुसावळात व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे बँक व तिजोरीची चावी त्याच्या ताब्यात असायच्या. राय याने रविवारी (दि.20) शासकीय सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.२१ वाजता बँक उघडली. त्यानंतर अवघ्या १४ मिनिटांतच तिजोरीतील २ किलो ६० ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन तो ८.३५ वाजता बाहेर पडल्याचे बँके बाहेरील दुसऱ्या ऑफीसच्या सीसीटीव्हीत दिसून आले आहे.

ऑडिटनंतर चोरीची पुष्टी…
सोमवारी (दि.21) सकाळी बँकेचे इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले. मात्र, शटरला कुलूप नसल्याने संशय बळावल्यामुळे ऑडिटरला देखील बोलावण्यात आले. बँकेने दिलेल्या कर्जाची पडताळणी व ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची मोजणी केल असता बँकेत तारण ठेवलेल्या एकुण २२ किलोपैकी २ किलो ६० ग्रॅम वजनाचे सोने कमी भरले. त्यातच व्यवस्थापक विशाल राय हा बँकेकडे फिरकला नाही. त्यामुळे चोरीचा संशय बळावून बँक प्रशासनाने बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी उत्तर प्रदेशात रवाना झाले आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : सोने चाेरणाऱ्या 'त्या' मॅनेजरच्या शोधासाठी पथक रवाना appeared first on पुढारी.