जायकवाडीला पाणी : नांदुरमध्यमेश्वरच्या दोन गेटमधून विसर्ग

नांदुरमध्यमेश्वर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंगापूर व दारणा धरण समुहामधून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी नांदुरमध्यमेश्वरमध्ये पोहचले आहे. नांदुरमध्यमेश्वरचे क्रमांक १ व ५ नंबरचे गेट ०.५० मीटरने उघडले असून वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावते आहे. पुढील दोन दिवस धरणांमधील विसर्ग कायम राहिल, अशी खात्रीलायक माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समुहातून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी ३.१४३ टीएमसी पाणी सोडले आहे. गंगापूरमधून ०.५ टीएमसी पाणी सोडले आहे. उर्वरित २.६४३ टीएमसी पाणी हे दारणा, मुकणे आणि कडवा धरणातून सुटले आहे. गंगापूर व दारणा समुहातून सोडलेले पाणी निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर येथे पोहचले. त्याठिकाणी नाशिक व औरंगाबाद पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पथकाने पाणी पातळी मोजली. त्यानंतर धरणाचे दोन दरवाजे ०.५० मिटरने उघडले. सध्या धरणातून १२ हजार ६२० क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावते आहे.

नाशिकच्या धरणांमधून सुटलेल्या पाण्याची चोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे संयुक्त पथक तैनात केले आहे. पथकामध्ये कार्यकारी अभियंता मनोज डोके, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता विनायक नखाते, निफाडचे तहसिलदार शरद घोरपडे, प्रशांत गोवर्धने, वैभव आडसूळ, योगेश राठोड, शरद नागरे, कचरू कातकाडे, टी. एस. मनवर यांचा समावेश आहे.

धरणांचा विसर्ग

धरण (क्युसेक)

दारणा १८५९

गंगापूर ५००

मुकणे ४८४

कडवा ३००

नांदुरमध्यमेश्वर १२६२०

हेही वाचा :

The post जायकवाडीला पाणी : नांदुरमध्यमेश्वरच्या दोन गेटमधून विसर्ग appeared first on पुढारी.