जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

आप पक्ष pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येते. भ्रष्टाचार व गुंडगिरी थोपविण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे शनिवारी (दि. ३) करण्यात आली. पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

आपतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे. दिवसाढवळ्या खून, बलात्कार, दराेड्याच्या घटना घडत आहेत. यावर गृह विभागाचा कोणताच अंकुश राहिलेला नाही. फडणवीस हे भाजपचा प्रचार वगळता राज्यात कोणतेही दुसरे काम करताना दिसून येत नाही. पेपरफुटीसारख्या घटना घडत असताना भाजप आमदाराच्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर राज्यातील जनता सुरक्षित कशी राहणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकार्यक्षम गृहमंत्री फडणवीस यांना पदावरून तत्काळ हटवावे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. तसेच भाजप नेते व आमदारांची गुंडगिरी थांबवण्यासाठी कारवाईची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे राज्य संघटनमंत्री नविंदर अहलुवालिया, चंदन पवार, गिरीश पाटील, स्वप्निल घिया, कलविंदर गरेवाल, युवा राज्य संघटनमंत्री प्रदीप लोखंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर 'आप'ची निदर्शने appeared first on पुढारी.