जिल्हा न्यायाधीश जगमलानी : जनतेपर्यंत योजना पोहोचविण्यात यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण

Jilha Nyadhish www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासन यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांमुळे सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी सर्वच विभागांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रविवारी (दि. ६) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद‌्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, धर्मादाय सहआयुक्त टी. ए. अकाली यांच्यासह विधी क्षेत्रातील विधी अधिकारी व इतर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

एस. डी. जगमलानी पुढे म्हणाले, न्याय सर्वांसाठी यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अन्य शासकीय कार्यालयांशी समन्वय ठेवत सर्वसामान्यांना जलद व कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करते. लोकअदालत, मध्यस्थी करून तसेच समुपदेशकांच्या माध्यमातून लोकांना जलदगतीने न्याय देण्याचे काम करण्यात येते. विधी सेवा प्राधिकरणाने मोफत विधी सेवासह वेगवेगळ्या कल्याणकारी योजना व कायद्यांची माहिती व जनजागृतीसाठी मेळावे घेत असल्याचे सांगितले.  आयुक्त गमे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना सुलभपणे लाभ मिळण्यासाठी प्रत्येक यंत्रणा आपापल्या चौकटीत राहून काम करावे, असे सांगितले. गंगाथरन डी यांनी मेळाव्यातून 10 विविध योजनांची माहिती, जनजागृती व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर यांनी आभार मानले. परिसरातील स्टॉल्स‌्ला मान्यवर आणि लाभार्थींनी भेट देत माहती जाणून घेतली.

१२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लोकअदालत…

विधी सेवा प्राधिकरणाने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षभरात 491 लोकांना व कारागृहातील 260 बंदींना मोफत विधी सेवा दिली. मध्यस्थीच्या प्रक्रियेद्वारे 457 प्रकरणे निकाली काढत लोकअदालतीमार्फत साधारण 60 हजार 896 प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याची माहिती एस. डी. जगमलानी यांनी दिली. 12 नोव्हेंबरच्या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यात या योजनांचा लाभ…

महामेळाव्याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेने किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा कर्ज, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार हमी, बचतगट कर्ज, पीएम स्वनिधी कर्ज, प्रधानमंत्री जीवनज्योती आणि सुरक्षा विमा योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला. नाशिक तहसीलने रेशनकार्ड व जातीच्या तसेच उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप केले. महापालिकेने पीएम स्वनिधी योजना; जिल्हा परिषदेने आयुष्मान भारत, दिव्यांग, बचतगट कर्ज, मनरेगा जॉबकार्ड; कृषीतर्फे यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग यांचा लाभ देण्यात आला. आरोग्य विभागाने आयुष्मान भारत कार्ड, गोल्ड, आरोग्य व दिव्यांग कार्डचे तर सामाजिक न्याय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.

हेही वाचा:

The post जिल्हा न्यायाधीश जगमलानी : जनतेपर्यंत योजना पोहोचविण्यात यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण appeared first on पुढारी.