जेलरोडला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा उत्साहात

Aditya Thakre pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा
देशातील प्रत्येक राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलने सुरू असल्याचे चित्र आहे. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये मोठे आंदोलन झाले. शेतकरी अस्वस्थ असून तेही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मणिपुरमध्ये अशांतता आहे. महाराष्ट्रात मराठा, धनगर आणि ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहेत, देशभरात आज सर्वत्र आंदोलने सुरू आहे. केंद्र शासन आंदोलन दडपण्याचा प्रयन्त करीत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा अन विधानसभा निवडणुकीत जनता मोदी सरकारला घरी पाठवून महाविकास आघाडीच्या हाती सत्ता सोपवतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

जेलरोड येथे बुधवारी ( दि.१४ ) युवा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, देशभरात बेरोजगारांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. दक्षिण भारतात मोदी सरकार विरोधात प्रचंड मोठा रोष आहे. त्या राज्यांना कर महसूलाचा वाटा दिला जात नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जातात. सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण चालू आहे. ईडीचा धाक दाखवत पक्ष फोडले जात आहे. राज्यात विद्यमान सरकारविरोधात वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही महापालिकेचा अथवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या जात नाही. त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. भाजप कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात असून त्यांनी वेळीच सावध व्हावे. त्यांना सामान्य जनतेत तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी आमच्या सोबत यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. महागाईवर भाजप बोलत नाही. महागाईवर कोणाचे लक्ष केंद्रित होऊ नये, यासाठी जातीपातीत वाद निर्माण केला जातो आहे, असाही आरोप ठाकरे यांनी केला.

याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्र अन संघर्षावर आधारित धडा शाळा, महाविद्यालयातील पाठ्यपुस्तकात घ्यावा, असे आव्हान महायुती सरकारला केले. वसंत गिते यांनी महायुतीचे सरकार राज्यात जाती-जातीमध्ये आरक्षणाच्या नावाखाली संघर्ष पेटवत असून महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करीत असल्याचा आरोप केला. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकही पोस्टर न लावता महाराष्ट्रात लोकसभेत घवघवीत यश मिळवून दाखवावे, असे आव्हान दिले.

करंजकर यांचे गोडसेंवर टीकास्त्र
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव न घेता त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपवर टीकास्त्र सोडले. संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून येत्या लोकसभा निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांना निश्चितपणे त्यांची जागा दाखवील, असा विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सुधाकर बडगुजर, विजय करंजकर, दत्ताजी गायकवाड, वसंत गीते, विनायक पांडे, विलास शिंदे, सचिन मराठे, सुनील बोराडे, सागर भोजने, प्रशांत दिवे, मंगला आढाव, गोटू आढाव ,रोशन आढाव दिनकर आढाव , योगेश गाडेकर, जगदीश गोडसे , मसूद जीलानी, योगेश नागरे, भारती तजनपुरे, वैभव पाळदे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राला सुसंस्कृत नेतृत्व हवे
महाराष्ट्र सध्या राजकीय सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड पिछाडीवर आहे. याचे कारण म्हणजे विद्यमान अपरिपक्व महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. विकसनशील महाराष्ट्र घडवायचा असेल तर सुसंस्कृत राजकीय नेतृत्व हवे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post जेलरोडला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा उत्साहात appeared first on पुढारी.