बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे

वाहतुक पोलीस pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) अंतर्गत ‘वन नेशन, वन चलन’ हा पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरू झाला आहे. याबाबत ई-चलन कारवाई करण्यासाठी लागणारे मशीन वाहतूक पोलिसांना मिळाले आहेत. मात्र या मशीनचा वापर करताना वाहतूक पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच काही तांत्रिक समस्या येत होत्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे वाहतूक पोलिसांना मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. (NIC- National Informatics Centre)

गृह विभागातर्फे एप्रिल २०२३ मध्ये नाशिक शहरात ‘एनआयसी’ ई-चलन पायलट प्रोजेक्टसाठी ५७ लाख रुपयांच्या खर्चाची मंजुरी दिली आहे. कारवाईसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी केल्यावर १ नोव्हेंबर २०२३ पासून नाशिकमध्ये कारवाईस सुरुवात झाली. १४९ मशीनमार्फत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाते. या मशीनवरून वाहनांवरील देशभरातील कारवाईचा लेखाजोखा व दंड एका क्लिकवर दिसतो, तसेच बेशिस्त चालकांवर कारवाई करणेही सोपे झाले आहे. त्यासंदर्भात नाशिक पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक आयुक्त आनंदा वाघ यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे नियोजन केले. बुधवारी (दि. १३) दिवसभर दोन सत्रांत वाहतूक शाखेच्या चारही पथकांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, सध्या राज्यात ई-चलन यंत्रणा त्रयस्थ संस्थेमार्फत कार्यान्वित आहे. मात्र, नाशिकमध्ये ई-चलन एनआयसी संलग्न केल्याने वेळेसह पैशांची बचत होत आहे. ‘वन नेशन, वन चलन’ अंतर्गत प्रथमच नाशिकमध्ये अंमलबजावणी झाल्याने पोलिस व न्यायालयीन यंत्रणेतील कार्यपद्धती सोयीस्कर झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

एनआयसी अंतर्गत नाशिकमध्ये सुरू असलेल्या ई-चलन पायलट प्रोजेक्ट मशीनचा वापर करताना अंमलदारांना काही अडचणी जाणवत होत्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी २०० अंमलदारांना दोन सत्रांत प्रशिक्षण देण्यात आले. – आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक.

हेही वाचा:

The post बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे appeared first on पुढारी.