प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

दरेकर शिंदे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि. 12) नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहील, असा दावा करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची एकतर्फी घोषणा केल्याने महायुतीत संघर्ष उफाळला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत शिंदे यांनी केलेली उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. एका बाजूला भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडीत समावेशासाठी वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. नाशिकमध्ये विद्यमान खासदार गोडसे हे शिंदे गटाचे असल्यामुळे शिंदे गटाचा नाशिकच्या जागेवर मूळ दावा आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर भाजपनेही नाशिकवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असताना, मंगळवारी शिंदे गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहील, असा दावा करत गोडसे यांच्या उमेदवारीचीच घोषणा केली. ‘पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने पाठवायचे आहे. गेली अनेक वर्षे हेमंत गोडसे हे या लोकसभा मतदारसंघासाठी काम करत आहेत’, असे खा. शिंदे म्हणाले. त्यामुळे भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

भाजप नेते दरेकर यांनी थेट खा. शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केला. ‘श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत, तिन्ही पक्षांच्या सुसंवादातून उमेदवारीचा निर्णय होईल. कुठेही विसंवाद होणार नाही. अंतिम निर्णय दिल्लीचे नेतृत्वच घेईल’, अशा शब्दांत दरेकर यांनी शिंदे यांच्या उमेदवारीच्या घोषणेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. महायुतीतील तिन्ही पक्षांपैकी फक्त भाजपचेच नेतृत्व म्हणजे जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, अमित शाह हे दिल्लीत असतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व मुंबईत असते. त्यामुळे भाजपच महायुतीचे उमेदवार ठरवणार, असेच संकेत दरेकरांनी दिले आहेत.

भाजपच्या इच्छुकांना धक्का
नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. भाजपकडून दिनकर पाटील, ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, ॲड. नितीन ठाकरे, अनिल जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. खा. शिंदे यांनी नाशिकची जागा शिंदे गटाकडेच म्हटल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबद्दल नाराजीचा सूर लावला आहे.

गोडसेंकडून सुटकेचा नि:श्वास
शिंदेंनी उमेदवारी घोषित केल्यानंतर चिंतेत असलेल्या गोडसेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.. ‘गेल्यावेळी आमचे १८ खासदार ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे १८ जागा आम्हाला द्यावा, असा आमचा आग्रह आहे. १० वर्षांत मी केलेली कामे बघून मला उमेदवारी मिळाली आहे. यामुळे कुणीही नाराज होऊ नये’, अशी भूमिका गोडसे यांनी मांडली आहे.

The post प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही appeared first on पुढारी.