खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण

शरद पवार यांच्यापुढे पुन्हा स्वगृही परतण्याचा पर्याय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असून, महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाला, तर दिंडोरीची जागा शरद पवार गटाकडून लढविली जाणार असल्याची घाेषणा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांनी केली. तसेच दिंडोरीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. विधानसभेला त्यांना जागा सोडू मात्र, त्यांनी आता सहकार्य करावे असे त्यांना सांगितल्याचे खा. पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

इंडिया आघाडीमधील काही पक्ष फुटत असल्याच्या प्रश्नावर बोलताना, असे काही ठिकाणी होत आहे. मात्र, सगळीकडे नाही. समाजवादी पक्ष हा देशातील मोठा पक्ष आहे. काँग्रेससोबत त्यांचा समझोता झाला आहे. तसेच केसीआर पंजाबमध्ये काँग्रेसबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे. ही यात्रा ज्या- ज्या ठिकाणी गेली, तिथे अनुकूल अनुभव आला. भाजपचे कर्नाटकमध्ये सरकार होते, तिथे काँग्रेसचे आल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

बारामतीमधून विजय शिवतारे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यामागे अदृश्य शक्ती असल्याचे सांगत शरद पवार यांनी शिवतारे हे विरोधी पक्षातच होते. ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी चांगली मते घेतली होती. आधी निवडून आले होते. आताचा परिणाम काय होतो हे बघू, जर ते महायुतीची मते घेत असतील, तर चांगलेच असल्याचे पवार यांनी सांगितले.

50 वर्षे जनता माझ्या बाजूने
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात प्रचार करताना सतत पवारांवर टीका करत असतात. यावर बोलताना पवार यांनी, माझ्यावर टीका केल्याचा मला आनंद आहे. शरद पवार यांना गेली 50 वर्षे जनता कौल देत निवडून देत आहे. याचा अर्थ त्यांना समजला पाहिजे, अशा शब्दांत उत्तर दिले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा दबावासाठी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना अल्पसंख्याक लोकांवर दबाव आणण्यासाठीच भाजपने कायदा आणला आहे. त्यांना एक मेसेज द्यायचा होता, त्यांनी तो दिल्याचे सांगत खा. पवार यांनी भाजपवर टीका केली.

The post खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण appeared first on पुढारी.