अख्खा दिवस ‘पाण्यातच’ जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा

सुपलीची मेट

नाशिक : गणेश सोनवणे

मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीअंतर्गत पाच मेट (वस्त्या) आहेत. या पाच वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तेराशेहून अधिक आहे. 264 कुटुंबे आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत या वस्त्या वसलेल्या आहेत. या भागात पाण्याचे दुर्भीक्ष आहे. इथल्या महिलांचा अख्खा दिवस पिण्याचे पाणी हुडकण्यातच जातो. प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे पिण्याचे टॅंकर पुरेसे नसल्याने पाण्यासाठी करावी लागणारी रोजची वणवण ही इथल्या आदिवासींची व्यथा आहे. (Water Scarcity Nashik)

सुपलीची मेट, गंगाद्वार, जांबाची वाडी, विनायक खिंड व पठारवाडी अशा या पाच मेट इथे आहेत. त्यातील विनायक खिंडचे सात वर्षांपूर्वी स्थलांतर झाले. अनेक सरकारी योजना गावात येतात, पण त्या कधी पूर्ण झाल्याचे इथल्या लोकांनी पाहिले नाही. आजही जलजीवनचे काम इथे सुरू आहे, पण तेही अर्धवटच आहे. (Water Scarcity Nashik)

एकट्या सुपलीची मेट येथे 84 कुटुंबे राहतात. तेथे गेल्यावर वैशाली झोले भेटल्या. नाशिकचे गिरणारे हे त्यांचे माहेर. त्या म्हणाल्या लग्नाला 14 वर्षे झाली पण डोक्यावरला हंडा अजून उतरला नाही. इथे नळाची सोयच नाही. नळ काय असतो ते आम्हाला माहितीच नाही. बाराही महिने आम्ही विहिरीतून पाणी उपसत डोक्यावरच हंडे वाहतो. घशाची तहान भागविण्यासाठी पायाला पोळ येईपर्यंत पायपीट करतो. आता जलजीवनचे नळ घरात आले, पण पाइपलाइनचे काम झालेले नसल्याने त्या नळांना पाणी नाही. त्या म्हणतात, गावात ग्रामपंचायतीचा पिण्याच्या पाण्याचा एक टॅंकर येतो. 84 कुटुंबांना तो कसा पुरणार? इन मिन दोन-ते तीन हंडे एकाच्या वाट्याला येतात. त्यातही दुजाभाव होऊ नये म्हणून टॅंकरचे पाणी विहिरीत ओतलं जातं. त्यानंतर दोरीने ओढून सर्व महिला ते पाणी भरतात. गावातली विहीर आटून गेल्याने, ज्यांना टॅंकरचे पाणी मिळालं नाही त्यांना गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीतून पायीच डोक्यावर पाणी आणावं लागतं. याशियाय जनावरांनाही पाणी लागतं. इतकंच काय आम्हाला दोन-तीन दिवसांच्या आड अंघोळी कराव्या लागत असल्याचे एक जण सहजच बोलून गेला. 

माजी सरपंच जगन झोले सांगतात, गावात आधी जलस्वराज योजना होती. आता जलजीवनचे साठ टक्के काम झाले आहे. विहीर खोदण्याचं काम सुरू केलंय. आधी 30 फूट होती आता 50 फुटांपर्यंत जाईल. दीड किलोमीटरवर तळेगाव डॅम आहे, तिथून पाइपलाइनने पाणी आणायचे आहे. पण, गावातली पोरं सांगतात महिन्यापासून तेही काम बंद पडलंय. ठेकेदारांना सांगून ही कामे तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी त्यांनी केली.

आम्हालाही वाटतं चार पैसे कमवावे… (Water Scarcity Nashik)

पर्यटनाला इथे बाराही महिने चांगला वाव असल्याने उदरनिर्वासाठी इथली पुरुषमंडळी डोलीचा व गाइडचा व्यवसाय करतात. आम्हा महिलांनाही वाटतं चार पैसे कमवून आणावे, काही तरी कामधंदा करावा. पण, काय करता अख्खा दिवस पाण्यातच जात असल्याने आम्हाला काहीच करता येत नाही, अशी खंत वैशाली यांनी बोलून दाखवली. फक्त चार महिने पावसाळ्यात भात लागवडीचे काम महिलांना करता येत असल्याचे वैशाली यांनी सांगितलं. 65 वर्षांच्या लक्ष्मीबाई लालू जाधव या आजही पाणी आणायला जातात. त्याचं शरीर त्यांना साथ देत नसलं तरी दुसरा पर्याय नसल्याचं त्या सांगतात.

आमचं मत पाण्याला…

निवडणुकांच्या प्रचाराच्या गोंगाटात या लोकांकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. अशात तुम्ही मतदान कुणाला करणार, असं विचारल्यावर आमचं ‘मत पाण्याला’ असे हे आदिवासी बांधव म्हणतात. जो आमचे प्रश्न सोडवेल त्याला मतदान करू पण अवघे पावणेआठशेच मते असल्याने आमच्या समस्यांकडे कुणी इतकं गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

The post अख्खा दिवस 'पाण्यातच' जातो, ब्रह्मगिरीच्या कुशीतील लेकरांची व्यथा appeared first on पुढारी.