वासंतिक नवरात्रोत्सवासानिमित्त ‘काळाराम’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

काळाराम मंदिर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
श्री काळाराम संस्थानतर्फे यंदाही रामनवमीनिमित्त मंगळवार (दि.९)पासून वासंतिक नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. यावेळी काळाराम मंदिरात धर्मादाय सहायक आयुक्त टी. एस. अकाली यांनी मर्यादापुरुषोत्तम श्री रामचंद्रांची महती कथन केली. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीराम वनवासातून अयोध्येत परत आले. त्यामुळे आजचा दिवस म्हणजे नवऊर्जा व चेतनेची सुरुवात आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनिलकुमार लोकवाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, विश्‍वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, शांताराम अवसरे, डॉ. एकनाथ कुलकर्णी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, ॲड. दिलीप कैचे, शुभम मंत्री उपस्थित होते.

उद्घाटक जगमलानी यांनी, नाशिक ही देवभूमी आहे. न्यायालयातील ताणतणावाचे काम करत असताना श्रीरामाचेही काम करण्याची संधी मिळते याचा मनस्वी आनंद होत असून, हे मंदिर म्हणजे खऱ्या अर्थाने तणावमुक्तीचे ठिकाण असल्याचे ते म्हणाले. उद्घाटनानंतरच्या सत्रात कीर्ती भवाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या कथक नृत्याचा आनंद रसिक श्रोत्यांनी घेतला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात पार्श्‍वगायक ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे यांच्या मराठी भाव व भक्तिगीतांचे सादरीकरण केले. ॲड. दत्तप्रसाद निकम यांनी मंदिराचा इतिहास मांडला.

वसंत उत्सव pudhari.news
पंचवटी : श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी धर्मादाय सहायक आयुक्त टी. एस. अकाली, जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, संस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश मनिलकुमार लोकवाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, विश्‍वस्त धनंजय पुजारी. (छाया : गणेश बोडके)

कार्यक्रमाची रूपरेषा
वासंतिक नवरात्र महोत्सवात दि. २० एप्रिलपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची अनुभूती श्री रामभक्तांना मिळणार आहे. यात गुरुवारी (दि.११) प्रसाद भंडारी यांचे बंध विमोचन राम, शुक्रवारी (दि.१२) डॉ. संतोष नेवपूरकर यांचे प्रसादातील आरोग्य, शनिवारी (दि.१३) विद्याधर ताठे यांचे संत जनाबाईची अभंग भक्ती, रविवारी (दि.१४) सुवर्णा देवधर यांचे गीतांमधून गीतेतील बोध, मंगळवारी (दि.१६) धनश्री नानिवडेकर यांचे समर्थायन व १८ तारखेला प्रेरणा देशपांडे यांचे मुक्ताई एकपात्री प्रयोग या विषयावर व्याख्यान होणार आहे.

रात्री ८ ते १० यावेळेत जीवन मराठी संगीत भक्तिगीते व भावगीत कार्यक्रम, मुर्च्छना भेटी लागी जीवा अभंगवारी, वेणू वादन, शास्त्रीय गायन, भजन संध्या, भक्तीधारा, होरी खेले रघुवीरा, श्रीराम व्हाया कबीरा, आत्मस्वर, सखी गीत रामायण, नृत्य गीत रामायण, भक्ती नाट्यगीते, राम रामेती, श्रीराम वंदना कार्यक्रम होतील. बुधवारी (दि.१७) दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव, तर सायंकाळी अन्नकोट महोत्सव कार्यक्रम होईल. शुक्रवारी (दि.१९) दुपारी साडेचार वाजता श्रीराम व गरुड रथयात्रा निघणार आहे.

हेही वाचा:

The post वासंतिक नवरात्रोत्सवासानिमित्त 'काळाराम'मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम appeared first on पुढारी.