दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ

लोहणेर दत्तजयंती www.pudhari.news

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा
गिरणा नदीच्या तीरावर वसलेले विठेवाडी हे देवळा तालुक्यातील महत्त्वाचे गाव. या गावाची एक विशिष्ट ओळख आहे ती म्हणजे येथील पुरातन महानुभाव पंथाचे एकमुखी दत्तमंदिर. विठेवाडी हे गाव चौफुलीवर वसलेले आहे. विठेवाडीपासून सटाणा – लोहोणेर – ठेंगोडामार्गे 13 किमी आहे. तर देवळा हे तालुक्या चे गाव 7 कि. मी. व कळवण 17 कि.मी. वर आहे.

प्रत्येक गावाला एक काहीतरी विशेषता लाभलेली असते . तसेच विठेवाडी गावाला ही एक आगळावेगळा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास साधारणपणे 150 वर्षांपूर्वीचा. मूळ गाव जरी विठेवाडी असले तरीही येथील लोक चितोडगडहून राजस्थान, मुंगीपैठणला आले. तद्नंतर उच्चभ्रू शहाण्णव कुळी मराठे हे विखुरले गेले. त्यातले प्रामुख्याने विठ्ठलपंत हे विठेवाडीत राहिले त्यावरून ही विठेवाडी उदयास व नावारूपास आली. विठेवाडीत (लो) मुख्यत्वे करून महानुभावपंथीय सावळे कुटुंब हे स्थिरस्थावर झाले. ( ज्याला शैवपंथीयही संबोधतात.) आजही सावळे परिवारातील चौथी पिढी येथील महानुभावपंथीय एकमुखी दत्त मंदिराच्या इतिहासाची साक्ष देतात. सावळे बंधू आज हे मंदिराच्या देखभालीसाठी प्रमुख भूमिका निभावत आहे. साधारणतः 150 वर्षांपूर्वी शंकर कृष्णा सावळे एकदा माहूरगडावर गेले असता तिथे त्यांना विभूतिरूपात एक दगड त्यांना (शैव) मिळाला. तो त्यांनी माहूरगडावरून स्वतः सोबत पायी पायी चालत विठेवाडी येथे आणला व त्याची स्थापना आपल्या घरातच केली. पण या दैवताचे नियम खूप कडक असल्याने घरातील विटाळचंडाळाचे एकत्रीकरणातून झालेली देवाची पूजा देवाला मान्य झाली नाही. तर ते दिवसभर झोपलेले होते. मग दाराशी भिक्षुक आले तेव्हा त्यांना दुपारी 12 वाजता जाग आली व त्यांना वाटले की आपण इतका वेळ कसे झोपू शकतो हे विचार करत असतानाच त्यांना देवाने दृष्टांत दिला व सांगितले की, मला ह्या घाणीतून बाहेर काढा व माझी कुठेतरी गावाबाहेर स्थापना करा, पण परिस्थिती गरिबीची असल्याने पर्याय म्हणून सर्व गावकरी मंडळींनी एकत्र येऊन कडुनिंबाची लाकडं तोडून त्या काळाप्रमाणे धाबेघर तथा लाकडी छप्पर बनवून दूर गावाबाहेर एकमुखी प्रभू दत्तात्रयांची गावकर्‍यांच्या संमतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. (महानुभाव पंथाच्या नियमानुसार जसे की त्यानां त्रिमूर्ती चालत नसल्याने त्यांनी एकमुखी दत्त महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.)

विठेवाडी येथील महानुभावपंथाचे एकमुखी दत्तमंदिर हे जागृत देवस्थान असून, सध्या या मंदिराची व्यवस्था येथील सावळे परिवार पाहत आहे. या ठिकाणी आलेले अनेक भाविक चांगले होऊन परत गेलेले आहेत. मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंतीनिमित्त यात्रा भरते. भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची यात्रा उत्सव व गुरुवारी व गोकुळाष्टमीला गर्दी असते. – जिभाऊ सावळे, सेवेकरी, दत्तमंदिर, विठेवाडी.

हेही वाचा:

The post दत्त जयंती-2022 : विठेवाडीतील प्रसिद्ध दत्तमंदिरात भाविकांचा ओघ appeared first on पुढारी.