दिंडोरीच्या रणतळेजवळ तिहेरी अपघात; सुदैवाने जीवीत हानी नाही

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळेजवळ बस सह तीन वाहनांमध्ये अपघात झाला. सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी बस व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी बस क्रमांक (एमएच 40 एन 9432) ही बस रणतळेजवळील चढा चढत असताना समोरुन नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने उतार्‍याला भरधाव वेगाने येत असलेली कार क्रमांक (एमएच १५ बीसी ६२२६) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने बसच्या पुढील व मागच्या चाकास धडक दिल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यात एकुण ३४ प्रवाशी प्रवास करीत होते. त्यात चार ते पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

तसेच बसच्या मागे असलेली कार क्रमांक (एमएच ०५ सीए १४४९ ) ही बसला मागून धडकली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. नाशिक ,दिंडोरी, वणी या रस्त्यावर अपघाताची कायम स्वरूपी मालिका सुरू असून त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याचे योग्य रितीने निरीक्षण करून नेमके कुठे काय गोष्टीची कमतरता आहे यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.

आतापर्यंत या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्याने या रस्त्यावर वळणांच्या जागेवर रेडीयम पट्टे,दिशादर्शक फलक, रेड सिंग्गल , इ.उभारणी करणे गरजेचे बनले आहे. तेव्हा कुठे तरी अपघातांला आळा बसु शकेल असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहेत.

 

The post दिंडोरीच्या रणतळेजवळ तिहेरी अपघात; सुदैवाने जीवीत हानी नाही appeared first on पुढारी.