दिंडोरीत बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला

बिबट्या,www.pudhari.news

दिंडोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  शहरालगतच निळवंडी रोडवरील जाधव वस्तीवर पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर दिंडोरीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील तत्काळ नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

सध्या गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. इतर ठिकाणांहुन मेंढपाळ चार्‍यासाठी भटकंती करत -करत दिंडोरी तालुक्यात येत आहे. तर काही ठिकाणी हे मेंढपाळ वाडीवस्ती परिसर बघून शेतकर्‍यांच्या रिकाम्या झालेल्या शेतामध्ये शेतकर्‍यांच्या सांगण्यानुसार मेंढ्या शेतामध्ये बसवत आहे. यानुसार दिंडोरी शहरातील जाधव वस्तीवरील प्रकाश लक्ष्मण जाधव यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये मेंढ्या बसवलेल्या होत्या. दिंडोरी येथील शेतकरी प्रकाश लक्ष्मण जाधव यांनी परिसरात असलेले मेंढपाल आबा ठेलारी यांना बोलावून आपल्या शेतातमध्ये मेंढ्या बसवण्यास सांगितले. त्यानुसार मेंढ्या बसवण्यात आल्या. सायंकाळी ठेलारी कुटूंब झोपल्यानंतर पहाटी 3 वाजेच्या सुमारास बिबट्या या परिसरात शिरला त्याने  मेंढपाल आबा ठेलारी (35) यांच्यावर हल्ला चढवला.  यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. प्रकाश जाधव यांना ठेलारी यांचा आवाज आल्याने ते घटनास्थळी शेताकडे गेले असता ठेलारी यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता, ते जखमी होते.  त्यांनी ठेलारी यांना तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले. तेथे तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून ते सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. दुधेरीया यांनी दिली. वन अधिकारी अशोक काळे यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतली. तसेच यावेळी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दिंडोरी शहरालगत मुरकूटे वस्ती, जाधव वस्ती, कोलवन नदी परिसर, धामण नदी परिसर, विंध्यावासिनी मंदिर परिसर आदी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शक्यतो जिथे बिबट्याचा वावर आहे तेथे मेंढपाळ किंवा अन्य कोणी वास्तव्यास आल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना माहीती देवून सावध करणे आवश्यक आहे. वास्तव्याच्या ठिकाणी आजुबाजुला प्रकाशाची व्यवस्था करावी. संबंधित मेंढपाळाची जिल्हा रूग्णालयात मी स्वतः भेट घेतली असुन संबंधित व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उपचार झाले आहे. ती व्यक्ती सुखरूप देखील आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न वनविभागाकडून करण्यात येतील.

– अशोक काळे, वन अधिकारी, दिंडोरी

दिंडोरी शहरालगतच बिबट्या हल्ला करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करावा. पिंजरा लावून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना बिबट्याचा दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी दिंडोरीकरांच्या वतीने करतो.

– नितीन धिंदळे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा :

The post दिंडोरीत बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला appeared first on पुढारी.