दिवाळीत फटाक्यांसाठी १२५ डेसिबलची मर्यादा

Nashik News,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे निर्माण हाेणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. दिवाळीसाठी नियमावली घोषित करताना १२५ डेसिबलपर्यंतच्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके फोडण्यास बंदी असून, फटाका स्टॉल, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक रस्ता, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांजवळ फटाके फोडण्यास निर्बंध घातले आहेत. (Nashik News)

अंधाराकडून तेजाकडे घेऊन जाणारा दीपोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या सणाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली घोषित केली आहे. त्यामध्ये १२५ डेसिबलवरील फटाक्यांना बंदी असणार आहे. फटाके उडविण्याबरोबरच फटाके विक्रेत्यांसाठी काही नियम आखून दिले आहेत. त्यानुसार एका ठिकाणी १०० पेक्षा जास्त स्टॉलला परवानगी नसेल. दोन स्टॉलमध्ये किमान ५० मीटरचे अंतर असावे. फटाक्यांच्या दुकानामध्ये आपत्कालीन मार्ग ठेवावा. फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी. दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नये. दुकानाच्या परिसरात धूम्रपानास बंदी असून, अग्निप्रतिबंधक उपाययोजना असावी. २५ ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, ३.८ सेमीपेक्षा जास्त लांबीचे व अ‍ॅटम बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेल्या फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. (Nashik News)

दिवाळीमध्ये फुटफुटी किंवा तडतडी, मल्टिमिक्स, चिलपाल, चिडचिडिया, बटरफ्लाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिवळा फॉस्फरसयुक्त अत्यंत विषारी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी असेल. मनाई केलेले आपटीबार व उखळी दारू उडविण्यासह 10 हजार फटाक्यांची माळ विक्रीस निर्बंध आहेत. लहान मुलांना फटका विक्री करू नये. शांतता क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडू नयेत.

-जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

हेही वाचा :

The post दिवाळीत फटाक्यांसाठी १२५ डेसिबलची मर्यादा appeared first on पुढारी.