धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

अक्कलपाडा प्रकल्प धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील 15 गावे, शिंदखेडा तालुक्यातील 5 गावे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज मान्यता दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील विविध जलाशयातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शर्मा यांनी पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील काही गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या शिफारशीनुसार अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या पाणीसाठ्यापैकी 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील 16 गावे, धुळे तालुक्यातील मौजे कुंडाणे, निमखेडी, जापी, शिरडाणे, न्याहळोद, धमाणे, अकलाड, कुसुंबा, मोराणे, भदाणे, नेर, कौठळ, तामसवाडी, हेंकळवाडी, मोहाडी प्र. डा. ही 15 गावे तर शिंदखेडा तालुक्यातील मौजे कंचनपूर, वालखेडा, अजंदे बु. बेटावद, पडावद अशी 5 गावे याप्रमाणे एकूण 36 गावांची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

The post धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता appeared first on पुढारी.