धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हयासह खान्देशातील वैद्यकिय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि अर्धे शतक वैद्यकीय सेवा करणार्‍या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. धुळे जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने हा पुरस्कार एका सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.

जिल्ह्यात वैद्यकिय आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणार्‍या जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने धुळ्यात जीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैद्यकिय क्षेत्रात तब्बल पन्नास वर्ष अविरतपणे वैद्यकिय सेवा देणार्‍या बालरोग तज्ज्ञांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. जी. आर. आगीवाल, डॉ. बी. के. काबरे, डॉ. अरुणा जोशी या बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. जी. आर. आगीवाल यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून व्यापारी संघटनेचे नितीन बंग यांनी पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कारार्थी बालरोग तज्ज्ञांच्या जीवन प्रवासावर डॉ. परिक्षीत देवरे आणि डॉ. कुणाल मेहता यांनी चित्रफीत सादर केली. डॉ. शरद बाविस्कर यांनी पुरस्कारार्थी डॉक्टरांचे स्केच तयार करुन भेट दिले. पुरस्कार सोहळ्यात डॉ. संजय जोशी, डॉ. जगदिश पाखरे, डॉ. दादाभाई पाटील यांचे आरोग्यावर मार्गदर्शक ठरणार्‍या विविध विषयांवरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास वाडीले यांनी प्रास्ताविक केले. डॉ.तुषार कानडे, डॉ.अभिनय दरवडे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. अविनाश सैंदाणे यांनी आभार मानले. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बालरोग तज्ज्ञ संघटनेचे सर्व पदाधिकारी व वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post धुळे : खान्देशातील बालरोग तज्ज्ञांना जीवन गौरव पुरस्कार appeared first on पुढारी.