धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप

घरफोडी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, देवपुरातील नकाने रोडवरील श्रीनाथनगरात चोरट्यांनी एका घरावर हात साफ केला .मात्र घटनास्थळावरच असलेल्या एका १७ वर्षे वयाच्या मुलीने वेळीच नागरिकांना सावध केल्याने चोरटे नागरिकांना सापडले. या चोरट्यांवर नागरिकांनी हात साफ करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांच्या हातून अंधारात पडलेली दागिन्यांची पिशवी बांधकाम रखवालदाराने परत केल्याने त्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

शहरातील श्रीनाथनगरातील प्लॉट नंबर 53 मध्ये सेवानिवृत्त मार्केटिंग अधिकारी कोमलसिंग सिसोदिया यांचे निवासस्थान आहे. सिसोदिया परिवार कानुमातेचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या मुलीकडे गेलेले होता. कुलूप बंद बंगला पाहून दोघे चोरटे आत शिरले. तर तिसरा चोर रस्त्यावरच लक्ष ठेवण्यासाठी थांबला. दरम्यान सिसोदिया यांच्या घरासमोरच राहणाऱ्या किरण पाटील यांच्या मुलीने हा प्रकार खिडकीतून पाहिला. त्यामुळे तिने वडिलांना हा प्रकार सांगताच त्यांनी भ्रमणध्वनीवरून परिसरातील नागरिकांना सावध केले. चोरटे बाहेर येताच नागरिकांनी त्यांना हटकले. त्यामुळे चोरट्यांनी पलायन सुरू केले. मात्र, नागरिकांनी त्यांना गाठून पकडले आणि चोप दिला.

दरम्यान याच परिसरात किरण पाटील यांचे बंधू जितेंद्र पाटील यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी कामगार म्हणून काम करणारे संजय वर्मा यांना चोरट्यांच्या हातातून रस्त्यावर पडलेली दागिन्यांची पिशवी सापडली. परिसरात चोरी झाल्याची माहिती वर्मा यांना मिळाली होती. त्यांनी ही पिशवी पाटील यांच्या माध्यमातून सिसोदिया यांच्याकडे सोपवली. वर्मा यांचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.

हेही वाचा :

The post धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप appeared first on पुढारी.