धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा : आमदार कुणाल पाटील

आमदार कुणाल पाटील

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे जिल्हयात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढावले आहे. शेत शिवारातील पिके करपली असून नदी नाले, तलाव कोरडे पडले आहेत. त्याचप्रमाणे पुरेसा व सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याकडे केली आहे.

धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आ. कुणाल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री तसेच धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षकांकडे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत मागणीचे पत्र दिले आहे.

धुळे जिल्हयात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या अडीच महिन्यात साधारण 60 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तब्बल 20 ते 25 दिवस पावसाचा खंड पडल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. अत्यल्प पावसावर शेतकर्‍यांनी जुलै महिन्यात पेरणी केली. शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होवून बी-बियाणे घेवून पेरणी केली. तुरळक पावसावर पिके जेमतेम तग धरत असताना पुन्हा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आजही शेतकर्‍यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालविल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. पुरेशा पावसाअभावी भविष्यात पिण्याच्या पाण्यासह चार्‍याचाही भीषण प्रश्‍न उभा राहणार आहे. शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न येणार नसून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन भरघोस मदत जाहीर करावी, धुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा 

The post धुळे जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहीर करा : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.