धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह

बालविवाह रोखला,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्हा बाल विवाहमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुबनेश्वरी एस. यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्हयात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमास ग्रामस्थांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहेत. या उपक्रमातंर्गत गावातील ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत असून काही प्रकरणात मुलीचे अथवा मुलांचे पालक कायदेशीर वयाबाबत चौकशी करीत असल्याचा अनुभव आला आहे.

शिरपूर तालुक्यातील करवंद येथे १८ एप्रिल रोजी १६ बर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याची माहिती देवेद्र पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच पोलीस विभागाच्या सहकार्याने होणारा बालविवाह हळदीच्या दिवशीच रोखला. दरम्यान बालिकेचा जन्मपुरावा तपासणी केला असता बालिकेचे वय १६ वर्ष असल्याची खात्री पटल्यानंतर मुलाचे नातेवाईक व मुलीचे नातेवाईक यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार होणारी कार्यवाही याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली. मुलाचे व मुलीचे पालक यांना बाल कल्याण समिती, धुळे यांच्या समोर उपस्थित राहण्या बाबत समज देण्यात आली. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही असे संमतीपत्र मुलीच्या कुटुंबियांकडून लिहून घेतले. ही कार्यवाही करतांना पोलीस विभाग, करवंद गावाचे ग्रामसेवक युवराज शिवदास देसले, तसेच पोलीस पाटील उपस्थित होते.

देवेंद्र पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत बुवनेश्वरी एस. यांनी अभिनंदन केले असून बाल विवाह संपुष्टात आणण्यासाठी राजकीय पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन बाल विवाह निर्मुलनासाठी आवाहन केले. समाजातील खुप मोठया समुदायापर्यंत संदेश पोहचु शकेल पर्यायाने जास्तीत जास्त जनता या मोहिमेत सहभागी होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.

…या क्रमांकावर संपर्क साधावा.

कमी वयात मुलीचे लग्न केल्यामुळे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात मुलीचे १८ वर्षाच्या आत व मुलाचे २१ वर्षांच्या आत लग्न करू नये, असे केल्यास शारीरीक व कायदेशीर गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. अल्पवयात गर्भधारणा झाल्यास माता व बाळ हे कुपोषीत होऊन अनेक आजार निर्माण होत असतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन बाल विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर फोन केल्यास आपले नांव, पत्याची आवश्यकता नसुन आपले नांव माहिती गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे बाल विवाह होत असल्याची माहिती न घाबरता सर्वांनी द्यावी असे आवाहन देवेद्र पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

मुलीचे वय किमान 18 व मुलाचे 21 हवे…

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. कायदेशीर वयाच्या आत मुला मुलीचे लग्न केल्यास तो बाल विवाह मानला जातो, कायद्याने गुन्हा ठरतो. १८ वर्षांवरील जो कोणी पुरुष बाल विवाह करील, तो २ वर्षापर्यंत इतक्या सश्रम कारावासाच्या किंवा एक लाखापर्यंत इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल. तसेच जो कोणी बाल विवाह लावील, त्याचे चालन, निदेशन करील किंवा त्यास प्रेरणा देईल त्यालाही दोन वर्षापर्यंत सश्रम कारावासाच्या किंवा एक लाखापर्यंत इतक्या द्रव्यदंडा शिक्षा होईल. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

The post धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.