धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती भीषण व भयावह आहे. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. तात्काळ दुष्काळ जाहीर न केल्यास धुळे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जाईल, असा इशारा इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी दिला.

धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी तरवाडे (ता.धुळे) येथे आज रास्ता रोको करण्यात आला.

अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरवली तर दुसरीकडे शासन मदत करत नाही. अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे. अशा संकटाच्या काळात बळीराजाने टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना वाढतात. माझी बळिराजास हात जोडून विनंती राहील की, वाईट विचार मनात आणू नका. तुमच्याकडचे सर्व पर्याय संपले असतील, तर खचून जाऊ नका, असे आवाहन भदाणे यांनी केले.

यावेळी इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी, पंचायत समिती सदस्य बाबाजी देसले, माजी सभापती नारायण देवरे, बोरकुंड सरपंच सुनिता हेमंत भदाणे, धाडरी सरपंच, भावलाल पाटील, मुन्ना पवार, तरवाडे माजी सरपंच अनिल पवार, भाऊसाहेब माळी, सोपान पाटील, जितेंद्र माळी, नाणे सरपंच अजय राजपूत, प्रकाश भदाणे, होरपाडाचे माजी सरपंच रवींद्र कठाळे, राजेंद्र मराठे यांच्यासह, गोताने, धाडरे, धाडरी, हेद्रुण, चांदे, दोंदवाड, आदी गावांतील व बोरी पट्टयातील विविध पदाधिकारी तसेच तालुकाभरातील शेकडो शेतकरी बंधू उपस्थित होते.

हेही वाचा 

The post धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.