धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचा दारुण पराभव

धुळे: पुढारी वृत्तसेवा : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि भदाणे गट पॅनलचा धुव्वा उडवित आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणूकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेल्या एका जागेसह 16 उमेदवार निवडून आले आहेत. खासदार सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल आज घोषीत करण्यात आला. आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूण 15 जागांवर निवडणूक लढविण्यात आली होती. त्यात त्यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे 15 जागांवर प्रत्येक उमेदवाराने तब्बल 225 मतांपेक्षा अधिक फरकाने मताधिक्क्य मिळवित विजय मिळविला आहे. दरम्यान, या आधी व्यापारी मतदार संघातून विजय चिंचोले यांची एक जागा महाविकास आघाडीची बिनविरोध निवडून आली होती. दरम्यान, भाजपच्या पॅनलमधील बाळासाहेब भदाणे, रावसाहेब गिरासे, विजय गजानन पाटील या प्रमुख उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवाला तोंड द्यावे लागले.

विजयी जल्लोष

धुळे बाजार समितीच्या हमाल मापाडी भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. आज दुपारी सर्व जागांचे निकाल घोषित होताच आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बाजार समितीच्या आवारात आ. कुणाल पाटील दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी, विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, ढोलताशांच्या निनादाने परिसर दणाणून निघाला होता. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी प्रथम बाजार समितीच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या बैलगाडी या शेतकर्‍याच्या प्रतिकाला अभिवादन केले. त्यानंतर बाजार समितीच्या आवारात विजयी सभेचे आयोजन करण्यात आले.

आमदार पाटील म्हणाले की, धुळे तालुक्यातील मतदारांना आणि जनतेला पैशाने विकत घेण्याची वल्गना विरोधक करीत होते. मात्र, आजच्या निकालाने तालुक्यातील जनतेने दाखवून दिले की, तालुका पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही. हा विजय शेतकर्‍यांचा आणि धुळे तालुक्यातील जनतेचा आहे. बाजार समितीचा कायापालाट करुन महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची बाजार समिती बनवूया, असेही पाटील म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, विजयी उमेदवार गुलाबराव कोतेकर, योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रशांत भदाणे, गणेश गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते प्रमोद जैन यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले.

भाजपच्या मातब्बरांना धक्का

बाजार समितीच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजपचे बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. खा. सुभाष भामरे, प्रा. अरविंद जाधव, माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे, गजानन पाटील, महापौर प्रतिभाताई चौधरी, जि.प.अध्यक्ष अश्‍विनी पवार, गजानन पाटील, भाजप अध्यक्ष अनुप अग्रवाल प्रचाराच्या मैदानात उतरले होते.
विजयी उमेदवार

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-

सेवा सहकारी मतदार संघातून

कोतेकर गुलाबराव धोंडू(850मते),

ठाकरे ऋषीकेश अनिलराव(846मते),

पाटील यशवंत दामू (827मते),

पाटील नानासाहेब देवराम (822मते),

पाटील बाजीराव हिरामण (804मते),

पाटील विशाल दिलीप (802मते),

माळी गंगाधर लोटन (773मते),

शिंदे विश्‍वास खंडू(889मते),

पाटील छाया प्रकाश (881मते),

पाटील नयना संदिप (884),

पाटील कुणाल दिगंबर (890मते),

ग्रामपंचायत मतदारसंघातून

पाटील रावसाहेब धर्मा (694मते),

पाटील योगेश विनायक(727 मते),

देवरे संभाजी राजपूत(728मते),

भिल सुरेश वंजी(703मते) हे उमेदवार विजयी झाले आहेत.

हेही वाचा 

The post धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपचा दारुण पराभव appeared first on पुढारी.