उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या

नाशिक : गौरव जोशी

यंदाच्या वर्षी उत्तर महाराष्ट्रावर पावसाने अवकृपा केली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाअभावी पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. परिणामी हंडाभर पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत आहे. विभागात चार जिल्ह्यांमधील १५५ गावे आणि ४४१ वाड्या अशा एकूण ५९६ ठिकाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे या भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून १३६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो.

पावसाने यंदा सर्वच अंदाज चुकीचे ठरविले आहे. देशात १९०१ पासून पहिल्यांदाच यंदाचा ऑगस्ट सर्वाधिक कोरडा आणि उष्ण ठरला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. राज्यातील कोकण व विदर्भाचा काही भाग वगळता अन्यत्र पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सर्वत्र सध्या टंचाईजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रालाही या टंचाईचे चटके बसत आहेत. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार सोडता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकरचा फेरा वाढला आहे. चार जिल्ह्यांमधील १८ तालुक्यांत ५९६ गावे-वाड्यांमधील तीन लाख २१ हजार ३८३ लोकसंख्येसाठी १३६ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येत आहे.

नाशिक व नगरला टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करावे लागत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जळगावमध्ये १५ टॅंकर सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून टँकरमुक्त जिल्हा अशी ओळख लाभलेल्या धुळ्यात पावसाअभावी एक टँकर कार्यान्वित झाला आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी स्थानिक प्रशासनांनी ११३ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये टँकरसाठीच्या ८९ व गावांसाठीच्या २४ विहिरींचा समावेश आहे. दरम्यान, हवामान विभागाने गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये चांगले पर्जन्य होईल. मात्र, तो सरासरी गाठणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. एकूणच भीषणता लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रातील टँकर लवकरच दीड शतक पार पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टँकरची स्थिती

जिल्हा     गावे/वाड्या   टँकर   अधिग्रहित विहिरी

नाशिक :      १३७             ६०            ४२

नगर :           ४४५             ६०            ०२

जळगाव :      १३             १५            १९

धुळे :             ०१             ०१             ५०

एकूण         ५९६      १३६        ११३

The post उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या appeared first on पुढारी.