खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त

दिंडोरी,www.pudhari.news

समाधान पाटील

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

दिंडोरी तालुक्यात सध्या कडक उन्हाचा तडाखा आणि पावसाने केलेला पोबारा या समीकरणाने तालुक्यातील खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवत आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हा बळीराजाला भयग्रस्त वाटु लागला आहे. पावसाळ्याची जवळजवळ ८५ दिवस उलटून गेले तरी दमदार पावसाची हजेरी तालुक्यात न झाल्याने मोठ्या हिंमतीने पेरणी केलेल्या पिकांचे काय होणार? असा प्रश्न सध्या बळीराजाला भेडसावत आहे.

धरणांचा तालुका, पावसाचे माहेरघर इतर तालुक्यातील नागरिकांना पाणी देणारा दिंडोरी तालुका हा सध्या दुष्काळजन्य परिस्थिती जीवन जगत आहे. कोरोना कालखंडात आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी वर्ग यंदाच्या खरीप हंगामात आपली आर्थिक बाजू मजबूत करील अशी आशा असतांना झाले मात्र उलटे.

तालुक्यात खरीप हंगामातील जवळपास ९५ ते ९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु पावसाळ्यात फक्त दोन नक्षत्रे बरसली व बाकी सर्व नक्षत्रे कोरडी गेल्याने पेरणी केलेल्या पिकांना आता पिवळेपणा यायला व करपायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पाऊस जर नाही झाला तर यंदाचा खरीप हंगाम हा वाया जाणार या भीतीने तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

अतिवृष्टी, अवकाळी परिस्थिती, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांतुन सावरण्यासाठी शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासुन नाममात्र एक रूपयांमध्ये शेतकरी वर्गाला पिक विमा योजना सुरू केली. या योजनेला तालुक्यातील शेतकरी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांच्या सामायिक हिश्श्यातुन शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेत तालुक्यातील शेतकरी वर्गाने चांगले पाऊल उचलून प्रतिसाद दिला आहे. परंतु आता यंदाच्या या दुष्काळ जन्य परिस्थितीमुळे पीक विमा तालुक्यातील बळीराजाला आर्थिक संजीवनी ठरेल का? असे बोलले जात आहे.

खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, जमिनीला पडल्या भेगा

सध्या पावसाने आपला लहरीपणा दाखवत पोबारा केल्याने सर्वच पिकांनी माना टाकल्या असून जमिनीला भेगा पडल्याने आता खरीप हंगामातील पिके भुईसपाट होणार असल्याचे चिन्हे पाहायला मिळत आहे. पाऊस पडण्याचे कुठलेच वातावरण तयार नसल्याने कडक उन्हाच्या तडाख्यात पिके आपल्या माना टाकत आहे. त्यामुळे यंदा मका, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, ज्वारी यांच्या उत्पादनांवर यांचा विपरीत परिणा होणार असे भय निर्माण झाले आहे. तर वांगी, कोथिंबीर व इतर भाजीपाला ही कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने बळीराजाचा आर्थिक आधार तुटला आहे. तसेच सध्या पाऊस नसल्याने जनावरांच्या चा-याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भवत असल्याने त्यांचा दुध व्यवसायावर विपरीत परिणाम दिसून येत आहे.

दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने आपला लहरीपणा दाखवल्यामुळे तालुक्यातील संपूर्ण गावांमधील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे बळीराजावर आर्थिक कोंडीची संकटमय मालिका तयार झाली आहे. यातुन शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी मायबाप सरकारने व शासनाने सक्तीची बँक वसुली थांबवावी.  त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल.
संतोष रहेरे (माजी सरपंच, अंबानेर ता.दिंडोरी )

हेही वाचा :

The post खरिपाच्या पिकांनी टाकल्या माना, बळीराजा चिंताग्रस्त appeared first on पुढारी.