धुळे महानगरपालिका प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

अंत्ययात्रा www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून देखील जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीने सोमवारी (दि.29) महानगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून रोष व्यक्त केला. धुळेकरांना सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

अंत्ययात्रा www.pudhari.news

धुळे मनपा प्रशासन व सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी (दि.29) शिवसेना धुळे महानगर व महिला आघाडीच्या वतीने मनपा प्रशासन व पाणीपुरवठा विभाग यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या प्रेतयात्रेवर हंङे व बादली तसेच कळशी असे साहित्य ठेवण्यात आले होते. या प्रेतयात्रेची सुरुवात शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून झाली. राणा प्रताप चौक, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, पोलीस चौकी, जे.बी.रोङ मार्गे नविन महानगरपालिका पर्यंत प्रेतयाञा काढण्यात आली. या ठिकाणी मनपा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मनपाच्या नावाने बोंब ठोकण्यात आली, या प्रेतयात्रेने रस्त्यावर बाजारात आलेल्या महिला व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महिलांनी प्रेतयात्रा आंदोलनात सहभागी होवून शिवसेनेच्या या आंदोलनाचे सर्मथन केले. विशेष म्हणजे या प्रेतयात्रेत प्रतिकात्मक तिरडीला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या चौघा महिला कार्यकर्त्यांनी खांदा दिला. तर पाणक्याच्या भूमिकेत महिला आघाडीच्या प्रमुख हेमा हेमाडे या होत्या. त्यांच्या हातात देखील रिकामा हंडा देण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील, ङाॅ.सुशील महाजन, महिला आघाडीच्या ङाॅ.जयश्री महाजन,अरूणा मोरे, ललित माळी, भरत मोरे, नरेंद्र परदेशी ,मच्छिंद्र निकम, संदिप सुर्यवंशी, विनोद जगताप आदींनी सहभाग घेतला. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तीव्र घोषणाबाजी केली.

हेही वाचा:

The post धुळे महानगरपालिका प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा appeared first on पुढारी.