धुळे: माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीला रामराम

अनिल गोटे

धुळे, पुढारी वृत्तसेवा: पक्षातील गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आज (दि.९) माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून कागदपत्रे आणि महत्त्वाच्या वस्तू माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote)  यांनी काढून घेतले होत्या. त्यानंतर त्यांनी सायंकाळी राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले होते.

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote)  यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून गोटे हे राष्ट्रवादीच्या पक्ष बांधणीच्या कामात सहभागी झाले होते. मात्र, गोटे हे राष्ट्रवादीमध्ये आल्यापासून जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली होती. अनेक कार्यक्रमांमधून दोन गटांचे हे मतभेद पक्षश्रेष्ठींच्या समोर उघडे पडले होते.

दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. पक्षांतर्गत गटबाजी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर अनेक वेळेस माहिती देऊन देखील त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आपली इतरांना अडचण नसावी, यासाठी आपण राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण शिंदखेडा तालुक्यात शिवार फेरीच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच राज्याचे माजी मंत्री जयकुमार रावळ यांच्या विरोधात जनजागृती मोहीम देखील उभारली. मात्र, या कार्यक्रमाला कोविडमुळे वरिष्ठ पातळीवरील नेते आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आपले विचार हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासारखेच आहेत. आपण शरद पवारांपासून लांब गेलेलो नाही. केवळ गटबाजीला कंटाळून पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीसंदर्भात त्यांनी भाष्य केले. या पक्षातून बाहेर पडलेल्या इतर नेत्यांसारखा मी बाहेर पडलेलो नाही. अजून विधानसभेला अनेक महिने बाकी आहेत. या कालावधीत अनेक घडामोडी घडतील. मात्र, आपण तूर्त कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

The post धुळे: माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीला रामराम appeared first on पुढारी.