धुळे : मामेभावांनीच काढला काटा…उभंड शिवारातील त्या खूनाची पोलिसांकडून उकल

Firing

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मानसिक त्रास असह्य झाल्यानेच दोघा मामेभावांनी तरुणाचा काटा काढण्याची बाब आता तपासात उघड झाली आहे. धुळे तालुक्यातील उभंड शिवारात यशवंत बागुल या तरुणाचा खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या अवघ्या 24 तासात आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या खुनाच्या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे.

धुळे तालुक्यातील उभंड बारीमध्ये यशवंत बागुल या तरुणाचा मृतदेह आढळला. त्याच्यावर गोळीबार करून धारदार शास्त्राने वार केल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेला 24 तास  उलटताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने संयुक्त तपास करून दोघा मारेकऱ्यांना गजाआड केले आहे. या घटनेची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी रामराव सोमवंशी हे देखील उपस्थित होते.

नेमकी घटना काय? 

मयत यशवंत बागुल यांची उभंड शिवारात शेती होती. त्यामुळे ते या गावात त्यांच्या मामाकडे अनेक दिवस राहत होते. या शेतीमध्ये डाळिंबाची झाडे लावलेली होती. या डाळिंबाच्या झाडांची बांधणी करण्यासाठी बागुल हे पिंपरखेडा येथे मजूर शोधण्यासाठी गेले. तेथून रात्री उशिरा परत येत असताना बारीमध्ये मोटरसायकल वरील दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार केल्याची माहिती बागुल यांच्या समवेत एकाच गाडीवर असणारे पंकज राजेंद्र मोहिते यांनी दिली.

म्हणून काढला काटा ?

या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.  यात पंकज राजेंद्र मोहिते यांच्या जवाबामध्ये मोठी तफावत आढळून आली. त्याचप्रमाणे आनंद लक्ष्मण मोहिते यांच्या देखील जबाब संशयित असल्यामुळे या दोघांना पोलीस पथकाने ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. त्यामुळे या खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. रागाच्या भरात पंकज मोहिते आणि आनंद मोहिते यांनी यशवंत बागुल यांचा काटा काढण्याची कबुली या दोघांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून यशवंत बागुल याने मानसिक त्रास देणे सुरू केले होते. तसेच गावात अपमान जनक वागणूक देणे सुरू ठेवले. त्यामुळे हा त्रास असह्य झाला. यातूनच बागुल यांच्या हत्येचा कट शिजल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली. बागुल यांच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. तर गळ्यावर धारदार शास्त्राने देखील वार करण्यात आले होते. या गुन्ह्याचा आणखी तपास सुरू असून यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

The post धुळे : मामेभावांनीच काढला काटा...उभंड शिवारातील त्या खूनाची पोलिसांकडून उकल appeared first on पुढारी.