धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

घरफोडी,www.pudhari.news

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील तामसवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व साक्री येथील अरिहंत नगरमधील रहिवाशी अरुण झिपा अहिरराव यांच्या घरी  घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांच्या किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

अरुण झिपा अहिरराव हे काल, दि. ३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पत्नीसह सटाणा येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी ८ वाजता परत आले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळले. त्यांच्या चुलतभाऊ प्रकाश अहिरराव यांच्या घरात बांधकाम सुरु असल्याने सायंकाळी ६ वाजता पाणी मारण्यासाठी आले असता तेव्हा कुलूप सुस्थितीत होते. म्हणजे चोरी ही सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान झाली.

चोरट्यांनी टाॅमी टाकून कुलूप तोडले. त्यांनी सरळ बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेले. यात साडेचार तोळ्याची माळ, अडीच तोळ्याचा राणीहार, ८ ग्रॅमच्या दोन चैन, २० ग्रॅमची एक चैन, बांगडी, नथ, कानातील जोड असा एकूण साडेतेरा तोळ्याचे दागिने होते.

घरमालक अरुण अहिरराव यांनी लगेच साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साक्री पोलीस ठाण्याचे सपोनी.मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसाद रवंदळे, मंगेश खैरनार, निखिल काकडे यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.