धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव

रास्ता रोको धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने धुळे शहरातील सर्वच भागात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नाेंदवण्यात आला. भर उन्हात अर्धातास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत प्र. अधिक्षक अभियंता यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध आज मंगळवार (दि.25) शिवसेनेने धुळ्यात रास्ता रोको आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पावसाचा शिडकावा होत पुरेसा पाऊस सुरू झाला तरी तासनतास विजपुरवठा खंडीत केला जात आहे. वाढत्या उष्मामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना वांरवार खंडीत विज पुरवठ्यामुळे लहान बालके, वयोवृद्ध, व्यापारी प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालये तसेच मनपाचा पाणी पुरवठा विभागही त्यामुळे हवालदिल झाले आहेत.

रास्ता रोको धुळे www.pudhari.news
धुळे : प्रभारी अधिक्षकअभियंता यांना घेराव घालून जाब विचारत निवेदन देताना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया: यशवंत हरणे)

विजेअभावी येथील मनपाचे जलकुंभ भरले जात नसल्याने ऐन उन्हाळ्यात अल्प प्रमाणात होणारा आठ दिवसाचा पाणीपुरवठा हा दहा बारा दिवसांवर गेला आहे. तसेच इन्व्हर्टर देखील विजेअभावी चार्ज होत नसल्याने इन्व्हर्टर असून नसल्यासारखेच आहे. विजेवर आधारीत छोटे मोठे व्यावसायिक, पाॅवरलूमधारक त्रस्त झाले आहेत. त्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. तसेच महावितरणकडून विजतारांना अडसर ठरणारे झाडे तोडण्याची कामे, जीर्ण व लोंबकळणाऱ्या विजतारा, उघड्या डि. पी., शहरातील अनेक दाट वस्ती व काॅलनी परिसरासत अनेक विद्युतपोल वाकलेले असून अद्यापही ते काम अपूर्णावस्थेत आहेत. विज बिलांचा नियमित भरणा करूनही नागरीकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अटी शर्तीनुसार कंपनी सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत आहे. विज खंडित झाल्यावर कर्मचारी तब्बल तास दोन तासानंतर दुरुस्तीसाठी घटनास्थळी पोहचतात. त्यांच्याकडे अनेकदा पुरेशी दुरुस्तीची साधने देखील उपलब्ध नसल्याने नागरीक व कर्मचारी यांच्यातील वाद टोकाला जातात. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असून शहरातील लोंबकळत असलेल्या व जीर्ण असलेल्या तारा बदलविण्याबाबत तसेच भूमिगत तारा टाकण्याबाबत शासनाकडून अनेकदा निधी मंजूर होऊनही कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फेज अनुसार शहरातील 90 टक्के ग्राहकांकडून विज बिलांची नियमित वसुली असतांनाही विद्युत कंपनीकडून व अधिकारी वर्गाच्या अकार्यक्षमतेमुळे शहरातील, पेठ भाग, मोगलाई, साक्रीरोड, महिंदळे, लालबाग, आझादनगर, कृषी महाविद्यालय, देवपूर, स्टेशन रोड आदी भागांतील विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. येथील सर्व कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देखील नसल्याने मनुष्यबळाअभावी नागरीक हवालदिल झाले असल्याचा आरोप निवेदनाव्दारे करण्यात आला आहे. निवेदनातील आदी मागण्या पूर्ण करून नागरीकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना विद्युत वितरण कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आ. प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, हेमा हेमाडे, जयश्री वानखेडे, संघटक गुलाब माळी, भरत मोरे, संदीप सुर्यवंशी, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, महादू गवळी, हिमांशु परदेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : वारंवार खंडीत विजपुरवठ्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता राेको; प्रभारी अधीक्षकांना घेराव appeared first on पुढारी.