धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतशिवारातून शेतकऱ्याचे पांढरे सोने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला साक्री पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांनीकडून सहा गुन्ह्याची उकल झाली आहे.

साक्री हद्दीतील अष्टाणे, कावठे, शेवाळी आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करुन त्यांच्यात शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला असताना अज्ञात चोरटयांनी वेगवेगळया शेतातुन कापूस चोरुन नेला होता. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. यावर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी या गुन्हयाच्या तपासासाठी पथक तयार करीत अज्ञात चोरटयांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान कापुस चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांनी साक्री हद्दीतुन अटक केल्याची माहिती मिळाली.

हे चोरटे नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांनी नंदुरबार व साक्री तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी कापुस चोरी केली असल्याची कबुली देऊन नंदुरबार पोलिसांकडे त्यांच्यावरील गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दिलीप किशोर भिल (रा.तलवाडे बु, ता. जि. नंदुरबार), सुरेश रामलाल माळी (रा. कोकले, ता.साक्री), जगदीश राजू माळचे, प्रमोद सुकदेव शिवदे व सुनिल बापू मरसाळे तिघे (रा. कावठे, व्ही.ए. देसले, ता.साक्री) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अष्टाणे, कावठे, शेवाळी, कासारे परिसरात कापुस चोरी केल्याची कबुली दिली. पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून ३० क्विंटल कापूस जप्त केला. या कापसाची २ लाख ४० हजार रुपये इतकी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कामगिरी साक्री पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्यासह पोसई बी. बी नन्हे, पोसई आर. व्ही. निकम, पोहेकॉ एस.जी. शिरसाठ, के.आर.पाटील, डी.आर.कांबळे, एन.डी. सोनवणे, पोना एस.एस. सावळे, शांतीलाल पाटील, पोका तुषार रमेश जाधव, जे. वाय.अहिरे, सुनिल अरुण अहिरे, सी.डी.गोसावी, प्रमोद जाधव,चेतन अढारे व जी.ए. शेख यांच्या पथकाने केली.

हेही वाचा : 

The post धुळे : साक्रीत पांढरे सोने लांबविणाऱ्या अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.