धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे, www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा करावा, त्याचप्रमाणे अन्यायकारक असणारी वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी राजीनामा अस्र उगारले आहे. एक दिवसाच्या या आंदोलन प्रसंगी आमदार शाह यांनी महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर टीकेची तोफ डागली आहे.

धुळ्याच्या क्यूमाईन क्लबच्या समोर आज एमआयएमचे आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. आ.शाह यांचे सोबत नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक मुक्तार अन्सारी, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साजीद साई, डॉ.दिपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, डॉ. शराफत अली, निजाम सैय्यद, कैसर अहमद, शोएब मुल्ला, डॉ.बापुराव पवार, इकबाल शाह, जमील खाटीक, सउद सरदार, रिझवान अन्सारी, आसिफ मुल्ला, अनिस शाह, सुलेमान मलिक आदी उपोषणात सहभागी झाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतील नगरसेवकांवर टीका केली. धुळेकरांना पाणी देण्यात अपयश आल्याचे खापर देखील या सत्ताधारी गटावर तसेच खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर फोडण्यात आले. यावेळी फारुख शाह यांनी महानगरपालिकेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. धुळेकर जनतेला प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असताना महानगरपालिका प्रशासन पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याची खोटी माहिती देत आहे. सर्वेक्षणाच्या नावाखाली देवपूर परिसरातील मालमत्ता धारकांवर अवास्तव आणि अन्यायकारक घरपट्टी वाढवण्यात आली आहे. या घरपट्टी संदर्भात नागरिकांमध्ये मोठा रोष असून हरकती नोंदवण्यात आले आहेत. मात्र या हरकतींवर सुनावणी घेण्याचे नाटक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महानगरपालिका प्रशासन केवळ अक्कलपाडा योजना अपूर्ण असल्याचे कारण देऊन वेळ मारून नेण्याचे काम करीत आहेत. मात्र या योजनेसाठी विजेचे केंद्र उभारण्याची जागाही अद्याप मनपाने ताब्यात घेतलेली नाही. त्यामुळे या योजना पूर्ण होण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे धुळेकर जनता वेठीस धरली जात आहे. या विरोधातच आपण आंदोलन करीत असून शासन स्तरावर देखील घरपट्टी कमी करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण appeared first on पुढारी.