नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या “अक्षता समिती” ने थांबविला बालविवाह

नंदुरबार,पुढारी वृत्तसेवा : दुर्गम भागातील एका अल्पवयीन मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांचे वेळीच समुपदेशन करीत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या “अक्षता समिती” ने बालविवाह थांबविला. आदिवासी भागातील समस्येचे मूळ बनलेल्या बालविवाह समस्येवर उपाय करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सुरू केलेल्या अक्षता समितीच्या कार्यालयास्वरूपात यश मिळू लागले आहे.

याविषयी अधिक वृत्त असे की, बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या असून बालविवाहामुळे बालकांच्या विशेषतः मुलींच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम होतात. बालविवाह या समस्येचे समुळ उच्चाटन झाले तर बालविवाहामुळे होणाऱ्या इतर आरोग्याच्या समस्या, कुपोषणाच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होईल. या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा महत्वाकांक्षी उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला होता. त्याअनुषंगाने दिनांक 30/03/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना चाईल्ड लाईन, नंदुरबर या संस्थेमार्फत माहिती मिळाली की, अक्कलकुवा तालुक्यातील वालंवा काठी येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेलच्या प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे व त्यांच्या पथकाने तात्काळ अक्कलकुवा तालुक्यातील वालंवा काठी येथे जावून अल्पवयीन मुलीची माहिती काढली. ती अल्पवयनी मुलगी 14 वर्षे 2 महिने वयाची होती व तिचा विवाह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्याच्या देवरुखली गावातील राहणान्या युवकासोबत दिनांक 30/03/2023 रोजी निश्चित करण्यात आला होता.

परंतु त्यापुर्वीच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेल व मोलगी पोलीस ठाणे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई, वडील व इतर नातेवाईकांना जाणीव दिली. बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलींना होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकावर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन केले. त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच मोलगी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस अल्पवयीन मुलीच्या पालकांना देण्यात आली. त्यावर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली…

हेही वाचंलत का?

The post नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या "अक्षता समिती" ने थांबविला बालविवाह appeared first on पुढारी.