नंदुरबार : पिमटी येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

पिंमटी

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : अक्कलकुवा तालुक्यातील पिमटी येथील गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर रस्ता कायम स्वरुपी बंद करण्यात आला. यावरून संतप्त ग्रामस्थ, धडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसआणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अक्कलकुवा येथे रस्तारोको आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

पिमटी येथील रस्ता बंद झाल्याने आदिवासी बांधव सोयीसुविधापासून वंचित राहत आहेत. येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अक्कलकुवा येथे पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, धडगाव तालुकाध्यक्ष राहुल पावरा यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको, थाळी नाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन अतिक्रमणधारकांवर दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष निलेश पाडवी, बाळासाहेब मोरे, करिम बलोच, युवक धडगाव शहराध्यक्ष सचिन पावरा, मिलिंन जाधव, हंसराज पाटील‌ आदीसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा 

The post नंदुरबार : पिमटी येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.